नागपूर जि. प. अध्यक्ष; कुमरे, कोकड्डे, कोहळे, कवरे, कौरती मैदानात
-नीलिमा ऊईके व हरीश ऊईकेनीही केला दावा
-सत्ता पक्षाची अध्यक्ष बंगल्यावर मॅरेथॉन बैठक सुरू
प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर सत्ता पक्षाकडे असलेल्या सात उमेदवारांनी आपली जोरदार मोर्चेबांधणी चालविली. यासाठी शांता कुमरे, मुक्त कोक्कडे, देवानंद कोहळे, प्रीतम कावरे, पिंकी कौरती मैदानात आहे. यासोबत नीलिमा ऊईके व गोंगपाचे हरीश ऊईकेनी पक्षश्रेष्ठींकडे चकरा वाढविल्या आहे.
या निवडीसाठी विध्यमान अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या बंगल्यावर मॅरेथॉन बैठकीला सुरुवात झाली आहे. सायंकाळपर्यंत खरे चित्र समजणार आहे. मात्र, शांता कुमरे यांचा दावा अतिशय प्रबळ मानण्यात येत आहे. त्यापाठोपाठ मुक्ता कोक्कडे, देवानंद कोहळे, प्रीतम कवरे, नीलिमा उईके व सत्ता पक्ष समर्थित गोंगपाचे हरीश उईके हे मैदानात कंबर कसून आहे. त्यांनीही पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केली. या बैठकीमध्ये माजी मंत्री व आमदार सुनील केदार, माजी मंत्री तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना गावंडे, सुरेश भोयर आदींची उपस्थिती असल्याची माहिती आहे. या प्रवर्गातून काँग्रेसकडे सात दावेदार आहे. बैठकीत अध्यक्षांपाठोपाठ उपाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते एक-एका सदस्याकडून मत जाणून घेणार असल्याची माहिती आहे. त्यातच अनुसूचित जमाती प्रवर्गातून दावेदार असलेल्या सात सदस्यांपैकी पक्ष कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालते हे जवळपास या बैठकीतून सिद्ध होणार आहे. सोबतच या बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक सदस्यांचे मत जाणून घेण्यात येईल. परंतु, अध्यक्षपदासाठी रामटेक तालुक्यातील वडंबा सर्कलच्या शांता कुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. अभ्यासू, अनुभवी आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. आदिवासींच्या प्रश्नी त्यांनी केलेली कामे सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला अधिक पसंतीक्रम मिळण्याची शक्यता सूत्र सांगतात.
– असा आहे अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम
आबासाहेब खेडकर सभागृहात १७ ऑक्टोबरला जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रवाटप, दुपारी तीन वाजता विशेष सभेला सुरुवात होईल. दुपारी ३.०५ ते ३.१५ दरम्यान प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी, दुपारी ३.१५ ते ३.३० यावेळेत नामनिर्देशनपत्रे परत घेण्याचा वेळ. आवश्यकता भासल्यास ३.४५ वाजतापासून मतदान होईल.
-पंचायत समिती सभापतींची निवड १५ रोजी
जिल्हा परिषदेंतर्गत १३ पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाचा कार्यकाळ १६ आॅक्टोबरला संपत आहे. शनिवार(१५ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता स्थानिक सभागृहात सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात येईल. या आशयाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी मंगळवारी(४ ऑक्टोबर) काढले.
त्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. काटोलसाठी तहसीलदार अजय चरडे, नरखेडसाठी तहसीलदार धुमासिंग जाधव, सावनेरकरिता प्रताप वाघमारे, कळमेश्वर: तहसीलदार सचिन यादव, रामटेक: तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पारशिवनी: तहसीलदार प्रशांत सांगडे, मौदा: तहसीलदार मलिक वीराणी, कामठी: तहसीलदार अक्षय पोयाम, उमरेड: तहसीलदार संदीप पुंडेकर, भिवापूर: तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, कुही: तहसीलदार शरद कांबळे, नागपूर ग्रामीण: तहसीलदार आशिष वानखेडे, हिंगणा : तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांचा समावेश आहे. सभापती निवडीनंतर कलम ६८ नुसार उपसभापतीपदाची निवडणूक याच सभेत घेण्यात येईल. संबंधित पीठासीन अधिकारी या सभेचे कामकाज पाहतील, असे आदेशात नमूद आहे.
– पं. स. सभापतीपदाची आरक्षण सोडत १० रोजी
१३ ही पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण सोडत सोमवारी(१० आक्टोबर) दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६२ च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग व महिलांकरिता हे आरक्षण काढण्यात येईल. हे आरक्षण फिरते राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.


