नागपुरात मोदींनी कुणाचा, कुठे वाजविला ढोल
-वाढीवला उत्साह, लुटला आनंद
प्रतिनिधी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास वायफळ टोलनाक्यावर आले. याठिकाणी त्यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. त्यावेळी मोदींची छबी टिपण्यासाठी अनेक कॅमेरे पुढे आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बाजूला झाले. ही बाब मोदींच्या लक्षात येताच त्यांना सोबत घेत फोटोबद्ध झालेत.
पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहमीप्रमाणे फोटोसेशन सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी टिपण्यासाठी कॅमेरामन्सची धावपळ सुरू होती. हे कॅमेरामन्स पंतप्रधान मोदी यांचे फोटो काढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फ्रेममधून बाजूला झाले. जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो व्यवस्थित येतील. मात्र, फोटो काढत असताना ही बाब नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आली आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना खांद्याला धरून आपल्या बाजूला उभे केले. त्यानंतर मोदींनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
वायफळ टोलनाक्यावर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी लेझीम आणि ढोलपथक उपस्थित होते. पंतप्रधान मोदी उद्घाटनावेळी या लेझीम आणि ढोलपथकाच्या जवळ केले. नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी फेरफटका मारला. तसेच ढोलपथकातील एका वाजंत्र्याकडून काठी घेऊन ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. पंतप्रधान मोदी यांच्या या कृतीने ढोलपथकातील कलाकारांचा उत्साह चांगलाच वाढला. मोदींचा ढोल वाजवतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जनतेशी परिणामकाररित्या संवाद कसा साधायचा किंवा त्यांना भावेल, अशी कोणती कृती करायची, यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी लगावलेले हे दोन मास्टरस्ट्रोक सगळ्यांच्या नजरेत भरणारे ठरले.


