नागपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत वेगवान घडामोडी
-इटकेलवारांचे तत्काळ निलंबन
-मातोश्रीवरूनही हलली सूत्रे
गजानन ढाकुलकर
नागपूर : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल गेला होता. पण काही वेगवान घडामोडींनंतर त्यांना माघार घ्यावी लागली. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मातोश्रीवरून कॉल आल्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी हा निर्णय घेतला. दरम्यान, इटकेलवारांचे तत्काळ निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे.
गंगाधर नाकाडे यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली होती. पण आता शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक सेनेचा मी विभागीय अध्यक्ष आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष अभ्यंकर यांचा मला कॉल आला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम आम्ही आता करू. या घडामोडींमुळे आमचा हिरमोड नक्कीच झाला आहे, असे नाकाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सांगितले.
गेल्या पाच वर्षांत आम्ही शिक्षकांसाठी भरपूर काम केले. कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले होते. संघटना चांगल्या पद्धतीने बांधली होती. ही जागा लढलो असतो, तर सर्वाधिक जास्त मतांनी ही जागा निवडून आली असती. पण श्रेष्ठी जो निर्णय घेतात, तो योग्य असतो. महाविकास आघाडीचा उमेदवार असो किंवा अन्य कुणीही, जे पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे गंगाधर नाकाडे यांनी सांगितले.
राज्यात पाच ठिकाणी, कोकण, औरंगाबाद, नागपूर येथे शिक्षक आणि नाशिक, अमरावती येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. यांपैकी नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक हे दोनच मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. नाशिक सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे आणि शिवसेनेचा पाठिंबा लाभलेल्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने, तर नागपूर गंगाधर नाकाडे यांची माघार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश इटकेलवार हे नॉट रिचेबल असल्यामुळे. आता नागपुरात रिंगणात २२ उमेदवार असणार आहेत.


