नागपुरातील या नेत्याची पुण्यातून निवडणूक आयोगाकडे तक्रार

नागपुरातील या नेत्याची पुण्यातून निवडणूक आयोगाकडे तक्रार

-हिंदुत्वासाठी मतदान करा. कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे’

प्रतिनिधी
पुणे :  नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेचा भंग राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, २३ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील केलेल्या भाषणात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करून स्पष्टपणे मतदारांना म्हटले की, ‘हिंदुत्वासाठी मतदान करा. कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे.’ या जोडीलाच त्यांनी श्री पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करून म्हटले की, कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांनी पुण्येश्वर महादेव मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.

निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावर निवडणूक आयोगानी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

-जाती-धर्माशी आधारित विधान

रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कसबामधील उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी दोन धर्मात फूट पडेल अशा प्रकारे जाणीवपूर्वक मतांचे ध्रुवीकरण होण्यासाठी वक्तव्य केलेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 2017 च्या निर्णयानुसार निवडणुकीतील कोणताही उमेदवार किंवा त्याच्याशी संबंधित नेते यांनी जाती-धर्माशी आधारित विधाने करणे गैर आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि हेमंत रासने यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.