थेट फडणवीसांना अडकविण्याचा डाव; त्या बाप-लेकाची व्हायची चर्चा
-पोलिसांच्या तपासात बाब उघड
प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी सट्टेबाज अनिल जयसिंघानी व त्यांच्या मुलगी अनिक्षा हिला बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हे दोन्ही बाप-लेक अमृता फडणवीसांशी संवाद साधण्यापूर्वी एकमेकांशी विस्तृत चर्चा करायचे. त्यात अमृता यांना कोणता व कसा मेसेज पाठवायचा? कोणत्या नंबरवरून पाठवायचा? हे ठरवले जायचे.
अनिक्षा, अमृता फडणवीस यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यापूर्वी आपल्या वडिलांशी चर्चा करायची. त्यानंतरच अमृता यांना व्हिडिओ किंवा मेसेज पाठवला जायचा. पोलिसांनी अनिल व अनिक्षा यांची कसून चौकशी केली. त्यात हा खुलासा झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिसांना एका मोबाईलमध्ये अमृता फडणवीस यांना पाठवण्यात येणाऱ्या मेसेजचे स्क्रीनशॉटही आढळलेत. त्यात या आरोपी बाप-लेकीची या मुद्यावर धीरगंभीर चर्चा झाल्याचे स्पष्ट होते.
अनिक्षा काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांना एक फॅशन डिझायनर म्हणून भेटली. पण ती फॅशन डिझायनर नसून कायद्याची विद्यार्थिनी असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. अनिक्षा जयसिंघानी हिने या प्रकरणी आतापर्यंत केवळ 2 जणांची नावे घेतली आहेत. पण ती पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी अनिक्षाने आपल्या व्यवसायाची खोटी माहिती दिल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अनिक्षाच्या घरून डिझायनर कपडे व काही साहित्य जप्त केले आहे. हे कपडे व साहित्य तिने कुणाकडून घेतले, पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा अनिक्षावर आरोप आहे. अमृता फडणवीस यांनी 16 मार्च रोजी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर अनिक्षाला अटक करण्यात आली. त्यानंतर तिच्या वडिलांनाही पोलिसांनी गुजरामधून अटक केली. अनिक्षाने अमृता यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर दिली होती. त्याबदल्यात आपल्या वडिलांवरील केसेस मागे घेण्याची विनंती तिने केली होती. मात्र, अमृता फडणवीस यांनी त्यास नकार दिल्याने तिने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.


