त्यांची दृष्टी गलिच्छ, विकृत; सुषमा अंधारे यांची खालच्या पातळीवर टीका

त्यांची दृष्टी गलिच्छ, विकृत; सुषमा अंधारे यांची खालच्या पातळीवर टीका
-शिरसाट यांना सत्ता आणि संपत्तीची धुंदी

प्रतिनिधी
बीड : आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. काय काय लफडे केले तिने काय माहीत, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. त्यांच्या या टीकेवर आता सुषमा अंधारे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. शिरसाट यांची महाराष्ट्रातील लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टी गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे.

आमदार संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. संजय शिरसाट म्हणाले, ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. काय काय लफडे केले तिने काय माहीत. अंबादास दानवे यांनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे. आम्हाला गद्दार म्हणताय अरे घरात बघ काय चाललेय. मग आमच्यावर टीका कर, असा टोला त्यांनी लगावला.

संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी देखील तिखट प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबूक पोस्ट करत शिरसाट यांचा समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील, पारमिता असावी लागते. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट सारख्या लोकांकडे अशी शील असण्याची सुतराम शक्यता नाही.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्याच्या ठायी शील, पारमिता नाही ती व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी तरी असु शकते का असा प्रश्न उरतोच. उलटपक्षी ‘सिर्साट’च्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकिबाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिला. म्हणुनच मला शिरसाठ यांच्या बोलण्याचा राग आला नाही. उलट स्वतः ची वैचारिक लायकी दाखवून दिल्या बद्दल त्यांचे अभिनंदन.

संजय शिरसाट सुषमा अंधारेंवर टीका करताना म्हणाले की, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या छत्रपती संभाजीनगरात आल्या होत्या. यावेळी त्यांची सुभेदारी विश्रामगृहात राहण्याची व्यवस्था केली होती. याची अंधारे यांनी मातोश्रीवर तक्रार केली होती. तेव्हा अंबादास दानवेंना मातोश्रीवरुन फोन आला आणि अर्ध्यातासात अंधारे यांची व्यवस्था रामा हॉटेलमध्ये करण्यात आली. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते.