ठरलंय! महाविकास आघाडीच्या मोर्च्याला शरद पवार संबोधणार
– भाषणाकडे सर्व देशाचे लक्ष
प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहे. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत.
तब्बेतीच्या कारणामुळे शरद पवार मविआच्या सभेस्थळी उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्यानं शरद पवारांनी खंत व्यक्त केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याबाबत जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी घेतली नाही. त्यांची केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.


