ठरलंय : भाजपा-सेना सरकारचा 7-7-चा फार्मुला, दुसरा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच
प्रतिनिधी
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून अनेक इच्छूक कामाला लागले आहेत. मात्र, हा विस्तार छोटेखानी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास 10 किंवा 14 आमदारांना मंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे शिंदे गटातील व भाजपमधील अनेक इच्छूकांची मनधरणी करण्यासाठी त्यांची महामंडळावर बोळवण केली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
–दिल्लीतून मिनी मंत्रिमंडळ विस्ताराचे आदेश
राज्यातील सत्तांतराला लवकरच एक पूर्ण होत आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त काही मिळाला नाही. मात्र, आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार हा छोटेखानी असेल असे वर्तविले जात आहे. दिल्लीतूनच तसे आदेश शिंदे-फडणवीस यांना देण्यात आली आहे.
–इच्छुकांना देणार महामंडळ
सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळीमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराजी असल्याची चर्चा आहे. तसेच याच मुद्द्यांवरुन विरोधकांकडून देखील सातत्यानं या सरकारवर टीका केली जात आहे. पण आता लवकरच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. सध्याच्या मंत्रीमंडळ विस्तारत भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर काही माध्यमांच्या म्हणण्यानुसार दोन्ही पक्षातून 7 व 7 जणांना मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आता होणार हा छोटेखानी विस्तार केल्यानंतर काही इच्छुकांची महामंडळावर बोळवण होऊ शकते.
राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून करण्यात येईल. भाजपच्या महाराष्ट्रातल्या मिशन फोर्टी फाईव्हला लाभदायक ठरू शकतील अशा नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मूळ शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीनंतर गेल्या वर्षी जून महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं. गेल्या 11 महिन्यांपासून शिंदे-फडणवीसांसह मंत्रिमंडळातील त्यांचे 19 सहकारी राज्याचा कारभार चालवतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन त्यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या वर्धापनदिनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा, असं मत मुख्यमंत्री शिंदेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं समजतं. त्याचा अर्थ राज्यात 19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


