गुजरातमध्ये 89 जागांसाठी सकाळी 19 टक्के मतदान

गुजरातमध्ये 89 जागांसाठी सकाळी 19 टक्के मतदान
-दोन कोटींहून अधिक मतदार बजावतील हक्क

प्रतिनिधी
गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील 89 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 19 टक्के मतदान झाले आहे. तापी येथे सर्वाधिक 26.47% आणि केम देवभूमी द्वारका येथे 15.86% मतदान झाले.

राज्यातील 19 जिल्ह्यांतील या जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात दोन कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पहिल्या टप्प्यातील एकूण 89 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 58, काँग्रेसकडे 26 आणि बीटीपीकडे 2, राष्ट्रवादीला एक जागा आहे.

-वासंदा येथे काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 89 मतदान जागांपैकी 2 जागा रिक्त होत्या. मोरबी, कच्छ, राजकोट, पोरबंदर आणि जुनागड या जागांवर आज विशेष लक्ष असेल. नवसारी जिल्ह्यातील वासंदा येथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये वासंदा येथील भाजपचे उमेदवार पियुष पटेल जखमी झाले. वासंदा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसकडून अनंत पटेल रिंगणात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. गुजरातचा मिनी आफ्रिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबूर गावात लोक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी येथे खास आदिवासी बूथ बनवण्यात आले आहे. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी पोलिंग पार्टिना पाठवण्यात आले होते. अनेक ठिकाणी बसमधून तर अनेक ठिकाणी बोटीतून निवडणूक साहित्याची वाहतूक करण्यात आली. 182 हून अधिक मतदान केंद्रांवर PWD कर्मचारी कार्यरत आहेत. 1,274 बूथवर सर्व महिला कर्मचारी उपस्थित राहतील.

-पहिल्या टप्प्यात आपचा प्रभाव
पहिल्या टप्प्यातील एकूण 89 जागांपैकी सहा ते सात जागा अशा आहेत, जिथे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा म्हणजेच आपचा प्रभाव आहे. यातील सहा जागा सुरत जिल्ह्यातील आहेत. तर एक जागा द्वारका जिल्ह्यात आहे. द्वारकाच्या खंभलिया मतदारसंघातून आपचे मुख्यमंत्री उमेदवार इशुदान गढवी रिंगणात आहेत.

– मोरबी चर्चेत, कुणाला कौल
पूल दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या मोरबी जिल्ह्यातील मोरबी, टंकारा आणि वांकानेर या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या जागांवर विजय-पराजयाचे आकडे बघितले तर 1962 पासून भाजपने सहावेळा तर काँग्रेसने पाचवेळा विजय मिळवला आहे. दोन वेळा अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. 2017 च्या मागील निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर, काँग्रेसच्या तिकिटावर पाटीदार प्रभावित मोरबी मतदारसंघातून विजयी झालेल्या ब्रजेश मेरजा यांनी पक्ष बदलला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. मात्र, यावेळी भाजपने ब्रजेश मेरजा यांना तिकीट न देता कांती अमृतिया यांना उमेदवारी दिली आहे.