गडकरी कुठंय! नागपुरात मोदींच्या कार्यक्रमापासून दूरची चर्चा
– उद्या देणार विकासाचा बुस्टर डोज
प्रतिनिधी
मुंबई:नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या 520 किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्या रविवार 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. परंतु, या सर्व धामधूमीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कुठंय, याचीही चर्चा नागपुरात जोरात आहे.
नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर खापरी मेट्रोस्थानक येथे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, वंदे मातरम रेल्वेगाडीला हिरवा झेंडा, मिहान एम्सचे लोकार्पण हे कार्यक्रम होतील.
–हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गविषयी
नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत.
समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग प्रकल्प हा देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसंदर्भाने महत्वाचा आहे.
सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्च करून बांधला जात असलेला 701 किमीचा हा द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे.
महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो. या द्रुतगती मार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांची संपर्क सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी हा महामार्ग साहाय्यकारी ठरणार आहे.
–नागपूर मेट्रोविषयी
नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणणारे आणखी एक पाऊल असलेला ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’ पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत.
खापरी मेट्रो स्थानकावरून पंतप्रधान खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.
नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. 6700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो टप्पा-2 ची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
-एम्स नागपूरविषयी
एम्स नागपूरच्या राष्ट्रार्पणाच्या माध्यमातून देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीची पंतप्रधानांची वचनबद्धता मजबूत केली जाईल.
जुलै 2017 मध्ये पंतप्रधानांनीच या रुग्णालयाची पायाभरणी केली होती, या रुग्णालयाची स्थापना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना या केंद्रीय क्षेत्रातील योजने अंतर्गत करण्यात आली आहे.
अद्ययावत आणि सुसज्ज एम्स नागपूर हे 1575 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केले जाणारे, बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, निदान सेवा, शस्त्रक्रिया विभाग आणि वैद्यकशास्त्रातील सर्व प्रमुख विशेष आणि सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 38 विभागांचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय आहे.


