कोर्टाची थेट टिप्पणी : पत्रकारांना मोकळेपणाने काम करू द्या

  • कोर्टाची थेट टिप्पणी : पत्रकारांना मोकळेपणाने काम करू द्या

-द वायर’ संपादकांचे फोन, लॅपटॉप व इतर साहित्य परत करा

प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने म्हटले आहे की, वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. पत्रकारांना मोकळेपणाने काम करू दिले नाही तर लोकशाहीच्या मुळावर तो खोल आघात असेल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पवनसिंह राजावत यांनी त्यांच्या लेखी टिप्पणीत म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण केले पाहिजे. न्या. राजावत यांनी दिल्ली पोलिसांना ‘द वायर’ या न्यूज पोर्टलच्या संपादकांचे फोन, लॅपटॉप आदी जप्त केलेली उपकरणे परत करण्याचे आदेश दिले आहेत.
अयोध्येत जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी भाजप नेते अमित मालवीय यांच्या तक्रारीवरून ‘वायर’च्या संपादकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती. चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने २३ सप्टेंबरला हे उपकरण परत करण्याचे आदेश दिले. या आदेशाला विरोध करत पोलिसांनी न्या. राजावत यांच्या कोर्टात अर्ज केला होता.

उपकरणे जप्त करणे हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन
न्या. राजावत यांनी आपल्या आदेशात म्हटले की, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्यामुळे संपादकांना काम करताना अडचणी येत आहेत. दिल्ली पोलिसांनी केलेली ही कारवाई घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे.