कोण म्हणाले? मुडद्यांमध्ये प्राण फुंकून महाराष्ट्रातील सरकार

कोण म्हणाले? मुडद्यांमध्ये प्राण फुंकून महाराष्ट्रातील सरकार
– पैशांचा वारेमाप वापर करून घटनाबाह्य सरकार

प्रतिनिधी
मुंबई : शिंदे सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. पैशांचा वारेमाप वापर करून राज्यात घटनाबाह्य सरकार बनवलेले आहे. हे जिवंत सरकार नाही. केंद्रातील महाशक्तीने मुडद्यांमध्ये प्राण फुंकून महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार बनवलेले आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी आम्ही सर्व प्रकराच्या लढाईस तयार आहोत. राज्यात गेल्या 4, 5 महिन्यांपासून घटनाबाह्य सरकार सत्तेत आहे, अशी टीका केली. संजय राऊत म्हणाले, शिंदे सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. शिंदे गटाला वाटतं आमच्याकडे महाशक्ती आहे. त्यामुळे आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही. मात्र, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सध्या उर्फी जावेदच्या कपड्यावरुन वाद निर्माण झाला आहे. तसेच, राहुल गांधींच्या थर्मल शर्टवरुनही भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. यावर संजय राऊत म्हणाले, कपड्यावरुन कसले वाद करताय. राहुल गांधी एखाद्या तपस्वीप्रमाणे भारत जोडो यात्रा करत आहे. मात्र, भाजप नेते कपडे, खाण्या-पिण्यावरुन देशात द्वेषाच वातावरण निर्माण करताय. या सर्वांवर उतारा म्हणून प्रेमाचा संदेश देण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. मात्र, कपड्यांवरून वाद निर्माण करून भाजपकडून या भावनेला तडा देण्याचे काम केले जात आहे.

-कानामधले बोळे काढा
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा, असे आव्हान दिले आहे. त्याचाही संजय राऊतांनी समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, आधी मी काय म्हणालो, हे नीट कान साफ करुन ऐका. कानामधले बोळे काढा. मी सत्तासंघर्षावर फेब्रुवारीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू शकतो, असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील शिंदे सरकार पडणारच आहे.

-राज्यात हे घटनाबाह्य सरकार
संजय राऊत म्हणाले, मुळात राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या पहिल्याच दिवशी निकाल लागू शकला असता. घटनाबाह्य सरकारला रोखणे हे न्यायालयाचे कामच आहे. राज्यात हे घटनाबाह्य सरकार जे निर्णय घेत आहे, भ्रष्टाचार करत आहे, हे सर्व राज्यच काय देशाच्याही हिताचे नाही. लोकशाही देशात आपण कोणते आदर्श निर्माण करतोय, हे या खटल्याच्या निकालावरुन स्पष्ट होईल. आमची बाजू न्यायाची आहे. त्यामुळे देशात न्यायव्यवस्था आहे की नाही, हे खटल्यावरुन सिद्ध होईल.

-आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आला. पैशांचा वारेमाप वापर करण्यात आला. आमदार पळवून लावण्यात आले. त्यामुळे पळपुट्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढेही या प्रकरणी सुनावणी होत आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आमचा निवडणूक आयोगावरही विश्वास आहे.