कोण म्हणाले ?, दाभोलकर करू याचा अर्थ डॉक्टर करू असा होतो का ?

कोण म्हणाले ?, दाभोलकर करू याचा अर्थ डॉक्टर करू असा होतो का ?
-अमरावतीच्या सौरभ पिंपळकर भाजपचा कार्यकर्ता

प्रतिनिधी
मुंबई : आम्ही तुमचा दाभोलकर करू, ही धमकी नाही का, असा खडा सवाल शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शरद पवार यांना सौरभ पिंपळकर याने ट्विटरवरून धमकी दिली आहे. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत.

सौरभ पिंपळकर अमरावतीचा असून, तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पिंपळकरचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतचे फोटोही समोर आलेत. त्यामुळे धमकी देणे आमच्या रक्तात नाही, असे म्हणणाऱ्या बावनकुळेंची आणि भाजपची कोंडी झाल्याचे दिसते.

अजित पवार म्हणाले की, जर एखादी व्यक्ती आम्ही तुमचा दाभोलकर करू म्हणते म्हणजे काय करू म्हणते? डॉक्टर करू? ते डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करू. पवार साहेब पण डॉक्टरेट आहेत. त्याच्यामुळे याला काही अर्थ नाही. भारताला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, त्यांना काय म्हणायचे आहे ते. बावनकुळे सारख्या व्यक्तींकडून अशी अपेक्षा अजिबात नाही.

अजित पवार म्हणाले की, आपण सरळ मान्य केले पाहिजे की, आमच्या माणसाचे चुकले आहे. हे असे होता कामा नये. महाराष्ट्राची संस्कृती सगळ्यांनी सांभाळली पाहिजे. मत-मतांतरे असू शकतात. मात्र, असे बोलणे योग्य नव्हे. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बोलू लागले, तर इतर पक्षातले कार्यकर्ते बोलतील. त्यातून महत्त्वाचे विकासाचे प्रश्न बाजूला राहतील. महत्त्वाच्या समस्या बाजूला राहतील. नको त्या गोष्टीकडे वळण मिळेल.

बावनकुळेंना माझा फोन झाला, तर मी बोलणार आहे. बावनकुळे तुम्ही काय बोलता? तुमचा दाभोळकर करू म्हणल्यानंतर ती धमकी नाही म्हणणे तुमच्या सदविवेक बुद्धीला पटते का? असा सवाल त्यांनी केला. तसेच काही भाजप कार्यकर्ते खूप पू्र्वीपासून नथुराम गोडसे सारख्या विकृतीचे उदात्तीकरण करत आहेत. काही भागात पुतळे उभा करणे सुरू केले. छगन भुजबळांना याची पूर्ण माहिती असल्याचे ते म्हणाले.

अजित पवार यांना भाजप आणि शिंदे गटाच्या कुरबुरीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. हा दोन्ही पक्षातला प्रश्न आहे. त्यांना विचारा, असे ते म्हणाले. तर छगन भुजबळ यांनी या भाजप आणि शिंदे गटातल्या मतभेदाला आमच्या शुभेच्छा आहेत , असा टोला हाणला.