कोण आहे ते महाराष्ट्रातील तीन चेहरे? भाजपा, काँग्रेसला मिळवून दिले यश
-वाचा काय म्हणाले लोकप्रतिनिधी
प्रतिनिधी
नागपूर : देशात चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे चेहरे चांगलेच झळकले आहेत. या राज्यांची जबाबदारी वेगवेगळ्या पक्षाने महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर सोपवली होती. यात सर्वात महत्त्वाचा असलेल्या मध्य प्रदेशची जबाबदारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. गोवा राज्यात लागलेल्या निकालाप्रमाणे मध्य प्रदेश मधील निकालाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मेहनतीला फळ दिले आहे. त्यानंतर राजस्थानची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर या मराठमोळ्या चेहऱ्याकडे दिलेली होती. विजया रहाटकर यांची कामगिरी देखील आता सर्वांसमोर आहे. राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले आहे. तर दुसरीकडे तेलंगणा राज्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली होती. मागील एक वर्षापासून माणिकराव ठाकरे तेलंगणामध्ये तळ ठोकून आहेत. तेलंगणामध्ये देखील काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवले आहे. एकंदरीत देशाच्या राजकारणात मराठी चेहरे पुन्हा एकदा झळकले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा चारही राज्यात प्रचार केला. मात्र त्यांच्यावर मध्य प्रदेशची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मध्य प्रदेश मध्ये विविध मतदार संघात त्यांनी प्रचार यात्रा तसेच सभा घेतल्या. या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया एका शब्दात व्यक्त केली. मला या निकालाचा अतिशय आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. मात्र, या विषयी मी सविस्तर नंतर बोलणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
निकालाचा आनंद झाला
मला या निकालाचा अतिशय आनंद झाला आहे. या विषयी मी सविस्तर नंतर बोलणार आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
नेतृत्वानेही एकदिलाने काम केले
आम्ही परिश्रम घेतले. भाजपचे शेकडो कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत होते. आमची संघटना खूप मजबूत आहे. कार्यकर्ता मन लावून काम करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लोकांना हवे आहे. भाजपचे संपूर्ण शीर्ष नेतृत्व निवडणुकीत काम करत होते. राज्यातील नेतृत्वानेही एकदिलाने काम केले.
– विजया रहाटकर, भाजप सहप्रभारी, राजस्थान


