कारण काय ? देशभरातील विधानसभा अध्यक्ष मुंबईत या नेत्याच्या घरी
-संसदीय आयुधांचा वापरावर चर्चा
प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत सध्या राष्ट्रीय आमदार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात देशभरातील आमदार, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, माजी आमदार, माजी विधानसभा अध्यक्ष आलेले आहे. दरम्यान, यानिमित्ताने शुक्रवारी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शासकीय निवासस्थानी डिनर डिप्लोमसी रंगली. यावेळी संसदीय आयुधांचा वापरावर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष निकालानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना दिलेल्या अधिकारामुळे ही भेट खास मानली जात आहे.
राष्ट्रीय आमदार परिषदेचा काल पहिला दिवस होता. या परिषदेच्या निमित्ताने रात्री राहुल नार्वेकरांच्या घरी रात्री स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अन्य राज्याचे सभापती, अध्यक्ष, आमदार यावेळी नार्वेकरांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
-निकालासाठी अध्यक्ष कितीही वेळ घेऊ शकतात
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. यामध्ये शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. याबाबत संसदीय आयुधांचा वापर कसा करता येईल, यावर चर्चा झाल्याची माहिती सांगितली जात आहे. हा निकाल ठराविक वेळेत देणं गरजेचं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. पण या निकालासाठी अध्यक्ष कितीही वेळ घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार असल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यायत येत आहे.
– गोगावले यांची नियुक्ती कायमस्वरूपी रद्द नाही
शिवसेना कोणाची आहे आणि प्रतोदपदी कोण राहील, याबाबत आधी निर्णय होईल आणि त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी यापूर्वी सांगितले होते. ते म्हणाले होते की, भरत गोगावले यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी रद्द केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या फेरनियुक्तीचेही संकेत आहेत. परिणामी ठाकरे गटाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ येणार आहे.


