काय सांगता! आता अमेरिकेतील शाळांत हिंदीचे शिक्षण
-सप्टेंबरपासून हिंदी शिक्षणाचा श्रीगणेशा
प्रतिनिधी
मुंबई : अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी शिक्षणाची दारे उघडताना दिसत आहेत. सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाची संघटना एशिया सोसायटी (एएस) आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्टशी (आयएआय) निगडित १०० हून जास्त लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे यासंदर्भातील प्रस्ताव दिला आहे. ८१६ कोटी रुपयांच्या निधीतून एक हजार शाळांत हिंदीचे शिक्षण सुरू होणार आहे. बायडेन यांचा भारताप्रति सकारात्मक दृष्टिकोन तसेच पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी सप्टेंबरपासून हिंदी शिक्षणाचा श्रीगणेशा होऊ शकतो.
एएस आणि आयएआयने हिंदीचे शिक्षण सुरू करण्यासाठी शिक्षकांची व्यवस्था आणि कोर्ससाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. प्राथमिक इयत्तेपासून सुरू होणाऱ्या हिंदी भाषेचा इंग्रजीनंतर दुसऱ्या भाषेच्या रूपात निवड करण्याचा पर्याय असेल.
–भारत तिसरी आर्थिक शक्ती
अमेरिकेतील बहुतेक शाळांमध्ये स्पॅनिश ही दुसरी भाषा म्हणून शिकवली जाते. नॉर्थ कॅरोलिनाचे व्हीप जय चौधरी म्हणतात की, पूर्वी अमेरिकेला स्पॅनिश भाषिक देशांत आर्थिक हितसंबंधांसाठी स्पॅनिश समजू शकणारी पिढी तयार करावी लागली. पण आता परिस्थिती बदलत आहे. या दशकाच्या अखेरीस भारत तिसरी आर्थिक शक्ती बनेल. अशा परिस्थितीत भारताची उत्तम जाण असलेल्या हिंदीचा अभ्यास करून अशी पिढी शाळांमधून बाहेर पडावी, हे अमेरिकेचे ध्येय असले पाहिजे. स्पॅनिश भाषिक देश आता आर्थिकदृष्ट्या यशस्वी नाहीत. हिंदी भाषा जाणणाऱ्या अमेरिकन तरुणांसाठी भारतातील उत्पादन, कृषी आणि आयटी क्षेत्रातील शक्यता येत्या काही वर्षांत वाढणार आहेत.
–सध्या ४ राज्यांत हिंदी शिकवणाऱ्या शाळा
अमेरिकेत न्यू जर्सी, टेक्सास, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया या भारतीय बहुल राज्यांमध्ये हिंदी शिकवणाऱ्या सुमारे १० शाळा आहेत. न्यू जर्सीमध्ये अशी शाळा चालवणारे बिशेन अग्रवाल सांगतात की, ५ ते १६ वयोगटातील मुलांना शनिवारी हिंदी शिकवले जाते. अभ्यासक्रमाचे नवे, माध्यमिक व उच्च असे तीन टप्पे आहेत. २० वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेत हिंदी शिकवणारी शाळा नव्हती. हिंदी शाळांमध्ये मुलांची पटसंख्याही वाढली असून दोन वर्षांपूर्वी, न्यू जर्सीमध्ये ९ मुले हिंदी शिकत होती, ती आता २५० पर्यंत गेली आहेत.


