काँग्रेसमध्ये वादळ: बावनकुळे यांचा थेट फोन
-हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न
प्रतिनिधी
नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीवरून कॉंग्रेसमध्ये मोठे वादळ आले आहे. पूर्वी शीतयुद्ध असलेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि थोरातांमधील संघर्ष आता उघड उघड सुरू झाला आहे. पटोलेंना मोठा विरोध होतो आहे, अशा परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब थोरातांना कॉल केला होता.
आमदार बावनकुळे आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. थोरात-पटोले वादाबाबत विचारले असता, ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीवर मी त्यांची भेट घेणं योग्य नाही. तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. बाळासाहेबांची नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे, हेसुद्धा मला माहीत नाही. त्यांच्या नाराजीचे कारण नाना पटोले यांनाच माहीत आहे. बाळासाहेब थोरात यांनी कधीच आम्हाला संपर्क केलेला नाही. पण मी त्यांना कॉल केला होता.
आयुष्याची चाळीस वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतली आहे. या गोष्टीचं वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल नऊ वेळा निवडून गेलेले ते नेते आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे आणि अशा नेत्याला पक्षात नाराज व्हावं लागतं, ही काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. भाजपमध्ये अशी नाराजी राहिली तर आम्ही लगेच दखल घेतो, असे बावनकुळे म्हणाले. हे सांगताना मी त्यांना काल वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मात्र त्यांचा फोन बंद होता, असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या दगडफेकीबाबत विचारले असता, बावनकुळे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी सांगितले की दगडफेक झाली. आता शिंदे गटाच्या आमदाराने हे दगडफेक केली का किंवा करवली का, हे पोलीस तपासून पाहतील. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा कृत्याचे कधीही समर्थन करणार नाहीत. कोणाच्याही ताफ्यावर दगडफेक करणे योग्य नाही. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील.


