आरक्षण का संपविताहेत याचा जाब भीमसैनिकांनी विचारला पाहिजे : माजी आमदार जगताप

आरक्षण का संपविताहेत याचा जाब भीमसैनिकांनी विचारला पाहिजे : माजी आमदार जगताप

-मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळा थाटात

प्रतिनिधी
चांदुर रेल्वे(अमरावती) : सर्वत्र खासगीकरण सुरू आहे. हे मोठे संकट देशासमोर आहे. नामविस्तार दिनाच्या निमित्ताने सर्व भीमसैनिकांनी आपण आरक्षण का संपविताहेत याचा जाब सरकारला विचारला पाहिजे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन धामणगाव मतदार संघाचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी केली.

येथील जिल्हा परिषद शाळा प्रांगणात रविवारी (१४ जानेवारी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार उत्सव समितीच्या वतीने नामविस्तार दिन सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी जगताप बोलत होते.

विचारपीठावर माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, चरणदास इंगोले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, आठवले गटाचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रा. प्रदीप दंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब डोंगरे, प्रकाश रंगारी, कैलास मोरे, बंडू आठवले, अशोक बनसोड, भूषण गाडगे, निरंजन गोसावी, सरिता राऊत, प्रभाकर भगत, प्रशांत बंड, दीपक मेश्राम, अशोक मेश्राम, सुमेध सरदार, विजय सोनवणे, प्रशांत मून व इतरांची उपस्थिती होती.

दरम्यान, पीरिपाचे चरणदास इंगोले यांनी नामांतराचा लढा दोन वर्ष सांगितला तरी अपुरा आहे. असा संघर्ष लिहिण्याची प्रेरणा आपल्याला कोरोना काळात मिळाली. ज्या भीमसैनिकांनी संघर्ष केला. तो अल्पवाधित सांगण्याची ही वेळ नाही. यासाठी तब्बल १६ वर्ष संघर्ष करावा लागला आहे. नाव मिळविण्यासाठी बलिदान करावे लागले, हे खरे तर दुर्दैव आहे. नामांतरांचा हा इतिहास निश्चित भाग्यशाली आहे. एकमेव समाज असा आहे की, औरंगाबाद विद्यापीठाच्या गेटवर नतमस्तक होतो. हा जगातील मोठा चमत्कार आहे. या निमित्ताने लोकशाहीचे जतन करण्याची वेळ तुम्हा-आम्हावर आली आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, प्रा.प्रदीप दंदे यांनी स्वातंत्र्याने काय दिले तर लोकशाही दिली. सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर त्या सरकारच्या मालकीच्या असल्या पाहिजे. येथील संपत्तीचे मालक तुम्ही, आम्ही आहो. त्याच्या रक्षणाची जबाबदारी संविधान मानणाऱ्या प्रत्येकाची आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना नानासाहेब डोंगरे म्हणाले, नामांतराची लढाई ही सर्व जाती धर्माची होती. तेथील महाविद्यालयातून लोक शिकून गेले. या महाविद्यालयाने सर्व धर्मभाव शिकविला. नाव देण्याची व नाव घेण्याची महती आज नामविस्ताराने कळली. शहिदाचे स्मरण व्हावे, त्यासाठी आजचा दिवस सर्वांसाठी महत्वाचा आहे.
यावेळी रामेश्वर अंभ्यकर, कैलास मोरे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.

संचालन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रसेंजित गायकवाड यांनी केले.
ते म्हणाले, नामांतराचा लढा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी चालविला. राज्यातील ९०० घरे जाळण्यात आली. या स्मृती अद्यापही घटनेची आठवण म्हणून प्रत्येक भीम अनुयायांच्या मनात तेवत आहे. येणाऱ्या पिढीसाठी नामविस्तार सोहळा इतिहासाचा खरा साक्षीदार आहे.

प्रास्ताविक निरंजन गोसावी यांनी केले. त्यांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांचे महत्वाचे योगदान आहे. दिवंगत नेते सीताराम मेश्राम, श्रीधर गजभिये, नारायण सोमकुवर यांचे या नामविस्तारासाठी जीवाचे रान करून आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या कार्याला उजाळा व स्मरण म्हणून हा सोहळा होत आहे, असे ते म्हणाले. यानंतर प्रसिद्ध गायक व समाज प्रबोधकार मनोजराजा गोसावी यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. तालुकाभरातील अनुयायांची उपस्थिती होती.