आता शिंदेसेनेच्या या आमदाराला हवी अंधेरी निवडणूक बिनविरोध
-लिहिले मुख्यमंत्री शिंदेना पत्र
प्रतिनिधी
मुंबई : दिवंगत आमदार रमेश लटके हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. ते नेहमी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवायचे. लोकांच्या प्रति काम करण्याची त्यांची तळमळ मी जवळून पाहिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध करणे हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल, त्यामुळेच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली.
-बिनविरोध निवडून देण्याचा पायंडा
विधानसभेत काम करताना मी सुनील राऊत आणि रमेश लटके आम्ही तिथे अनेक विषयांवर एकत्रित बसून सल्ला मसलत करीत होतो. ते माझे खूप चांगले मित्र होते. शाखाप्रमुख पासून नगरसेवक आणि आमदार असा अत्यंत खडतर प्रवास त्यांनी केला होता.
सरनाईक म्हणाले, मला आजही आठवते की, मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लटकेंनी अंधेरी भागात खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मी या कार्यक्रमास उपस्थित होतो. महाराष्ट्राची एक विशेष अशी अलिखित राजकीय संस्कृती आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी दुर्दैवाने मृत्युमुखी पडतो. तेथे आपण त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून देण्याचा एक पायंडा आहे.
-मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
पुढे सरनाईक म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. राष्ट्रवादी कॉंग्रेससह अनेक पक्षांचीही हीच भूमिका आहे. आपल्या युतीत ही जागा भारतीय जनता पक्षाला गेली आहे. परंतु राज्याचे प्रमुख या नात्याने आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. जेणे करून आपल्या महाराष्ट्रच्या राजकीय संस्कृतीचे जतन तर होईलच, पण त्याच सोबत रमेश लटकेंना देखील एक वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल.
-आता निर्णयाचा चेंडू भाजपाकडे
सरनाईक म्हणाले, अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडणूक लढवत आहे. शिंदे गट म्हणून आमचा त्यांना पाठींबा आहे. आम्ही उमेदवार उभा केला नाही. परंतु, आता भाजपचे नेते याबाबत ठरवतील, शेवटी एवढेच की, रमेश लटके हे माझे मित्र होते. माझी भूमिका स्पष्ट आहे की, त्यांची रिक्त जागा त्यांच्या पत्नी लढवत असल्याने ती बिनविरोध व्हायला हवी.
-अनेक आठवणी स्मरणात
सरनाईकांच्या पत्रातील लटकेंबाबतचा मजकूर असा की, दुबईला रमेश लटके जेम्स आपल्या कुटुंबियांच्या समवेत गेले होते, तेव्हा माझे मित्र व उद्योगपती राज शेट्टी यांच्याच हॉटेल मध्ये ते थांबले होते. दुर्दैवाने तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हे कळताच राज शेट्टी यांनी तेथे धाव घेतली आणि तत्काळ त्यांना वैद्यकीय मदत केली. परंतु, त्या पूर्वीच त्यांचे निधन झाले. राज शेट्टी यांनी सर्वप्रथम दुबईवरून फोन करून ही घटना मला सांगितली. अक्षरशः धक्का बसला, काही सुचेना झाले. मी आमदार सुनील राऊत व तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांना हि घटना फोन करून कळवली. त्यानंतर राज शेट्टी यांनी दुबई सरकारचे अत्यंत खडतर असे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून लवकरात लवकर मृतदेह विमानाने मुंबईत पोहचवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली.


