आज पावसाळी अधिवेशनाचे सूप, नागपूर अधिवेशनाची तारीख ठरणार

आज पावसाळी अधिवेशनाचे सूप, नागपूर अधिवेशनाची तारीख ठरणार

-सत्ताधारी आणि विरोधकातील खडाजंगी

प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. एक दिवस आधी विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली जाईल. तसेच राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर देखील आज घमासान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहीर करण्यात आलेली नाही, यावरुन विरोधक सरकारला घेण्याचा प्रयत्न करतील.

महागाई, संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी अशा विविध मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतील. अंतिम आठवडा प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री आणि प्रमुख नेत्यांची भाषणे आज होतील. अखेर चहापानाच्या कार्यक्रमाने अधिवेशनाचा शेवट होईल.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न, समृद्धी महामार्गावर झालेले अपघात, पावसाने झालेले नुकसान, दुबार पेरणची संकट, शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने करण्यात येत असलेली मदत असे अनेक मुद्दे गाजले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरही या आठवड्यात सविस्तर चर्चा झाली.