असे काय झाले? दादांनी काकांची घेतली दुसऱ्यांदा भेट ?

असे काय झाले? दादांनी काकांची घेतली दुसऱ्यांदा भेट ?

-अपात्रतेची कारवाई होणार

प्रतिनिधी
मुंबई :  अजित पवार व त्यांच्या समर्थकांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असताना अजित पवारांनी स्वतःसह सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांवरील अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी ही भेट घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

अजित पवार आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी 8 नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. तसेच राज्यातही खळबळ माजली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे एका पत्राद्वारे अजित पवारांसह 9 जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. आता हेच पत्र अजित पवार व त्यांच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा दावा केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी सलग दोन पवारांच्या घेतलेल्या भेटीमागेही हेच प्रमुख कारण आहे. शरद पवार व अजित पवार गटातील सोमवारची बैठक रविवारसारखीच पूर्वनियोजित नव्हती. पण ते आल्याचे कळताच शरद पवार सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानाहून थेट यशवंतराव चव्हाण सेंटरवर आले. त्यांनी तिथे त्यांची भेट घेतली.

यावेळी शरद पवार, अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यात जवळपास तासभर बंद दरवाज्याआड चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. पण मंत्र्यांवरील अपात्रतेच्या संभाव्य कारवाईच्या भीतीपोटीच अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. बैठकीत बंडखोर आमदारांनी शरद पवारांकडे पक्षाच्या 9 मंत्र्यांना अपात्र न करता त्यावर एखादा सर्वमान्य तोडगा काढावा, असा आग्रह धरल्याची माहिती आहे.