अजितदादांना मुख्यमंत्रीपद, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं!
-फडणवीस यांचे एका मुलाखतीत वक्तव्य
प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत सातत्याने नवनव्या बातम्या येत असतात. कधी त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत असतात, तर कधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केली जातेय. याशिवाय अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा आपल्याला मुख्यमंत्रीपदाने अनेकदा हुलकावणी दिल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं. आपण पाचवेळी उपमुख्यमंत्री बनलो, पण मुख्यमंत्रीपदी अद्याप विराजमान झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
या सर्व घडामोडींदरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मत व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका ‘हिंदी’ वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. आपण अजित पवार यांना सत्तेत का घेतलं? तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली होती? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली.
–एनसीपीचे लेटर माझ्या घरात तयार
“विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडीया ही शरद पवारांची होती. मी इतक्या लवकर भूमिका बदलू शकत नाही. राष्ट्रपती शासन लागल्यावर एनसीपीलाही लेटर देण्यात आलं. हे एनसीपीचं लेटर माझ्या घरात तयार झालं. त्यावर त्यांनी सही केली. जेव्हा आमच्यासोबत शिवसेनेनं विश्वासघात केला तेव्हा पवारांनी आमच्यासोबत बातचीत केली. ते सरकार बनवण्यासाठी तयार होते”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.


