अखेर राज्यपाल कोश्यारी हटले: रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
-बैस झारखंडचे होते राज्यपाल
प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
–ही आहे राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी
लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड
शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड
अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर
एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अनेकदा असंतोष धुमसला. थेट युवराज संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
– राजीनाम्याची इच्छा
केंद्रावरही भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी स्वतः कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे.
-ही नावेसुद्धा राहिली चर्चेत
महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. आता अचानक काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


