अकोल्याचा आमदार फडणवीसांना पाणी पाजण्यासाठी नागपुरात
-सोबत शेकडो महिलांचा ताफा
प्रतिनिधी
नागपूर/अमरावती : अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील 69 गावांतील महिला आपापल्या गावातील पाणी एका ठिकाणी जमा करणार आहे. आणि हे पाणी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नेण्यात येईल. बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारातून महिला हे अनोखे आंदोलन करणार आहेत. देवेंद्र फडणवीस निश्चित पाणी पितील आणि अंघोळही करतील, असा विश्वास नितीन देशमुख यांनी व्यक्त केला.
अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भाग हा खारपान पट्टा आहे. त्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खारे पाणी प्यावे लागत आहे. खाऱ्या पाण्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आजार पसरलेले आहेत. लहान मुलांनाही हेच पाणी पाजावे लागत असल्याने लहान बालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी 69 खेड्यांसाठी पदयात्रा सुरु केली आहे. ही पदयात्रा अकोल्याहून अमरावती आणि त्यानंतर नागपूरपर्यंत जाणार आहे. 10 एप्रिल पासून अकोल्यातून ही यात्रा सुरु झाली आहे. 21 एप्रिलला ही पदयात्रा नागपूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी पोहचणार आहे.


