महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजपा- शिंदेसेनेत तणाव
-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला प्लान बी
प्रतिनिधी
मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार येत्या २३ डिसेंबरपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तसेच १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्व पक्ष पूर्वतयारीला लागले आहेत. आता मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) जागावाटपावरूनदेखील भाजपा आणि शिवसेनेत (शिंदे) तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांसाठी जागावाटपावरून भाजपाबरोबर चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ठोस ‘बॅकअप प्लॅन’ (पर्यायी योजना) तयार केल्याची माहिती सूत्रांनी ‘न्यूज १८’ ला दिली आहे.
महापालिका निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या चर्चेत शिंदे यांच्या शिवसेनेने १२५ जागांची अधिकृत मागणी केली आहे; तर भाजपाने सुरुवातीला केवळ ५० ते ६० जागांचा प्रस्ताव दिल्याचे समजते. दोन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र, असे असले तरी चर्चा दोन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यास मुंबईतील सर्व २२७ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाने सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून शिवसेनेकडून मंगळवारी (१६ डिसेंबर) मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
राहुल शेवाळे म्हणतात…
शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतींसाठी मुंबईतून तब्बल २,७०० इच्छुक उमेदवार उपस्थित होते. युतीचा निर्णय काहीही झाला तरी, प्रत्येक प्रभागात सक्षम आणि निवडून येणारा उमेदवार तयार असावा, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. शेवाळे म्हणाले, “शिवसेना महायुतीचा घटक म्हणून मुंबई महापालिका निवडणूक लढवेल; पण आमचा भर सर्वोत्तम उमेदवार देण्यावर आहे. म्हणूनच सर्व प्रभागांमध्ये मुलाखती घेण्यात आल्या.
ते पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक व्हावी यासाठी तीन निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मुंबईतील इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेच्या मुलाखतींना मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. “हा प्रतिसाद म्हणजे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची पावती आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतीसाठी आलेल्या अनेक इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व काँग्रेसमधील नेत्यांचाही समावेश होता. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासाठी ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक असेल. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणि तळागाळातील पकड सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपाबरोबरचे जागावाटप सुरळीत पार पडेल, असा विश्वास पक्षाला आहे; परंतु शिंदेंनी पक्षातील नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, “जर काही कारणास्तव चर्चा अपयशी ठरली, तर पक्ष सर्व २२७ जागांवर स्वबळावर लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.” सध्याच्या चर्चेनुसार, दोन्ही मित्रपक्षांमध्ये ‘उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता’ या निकषावर आतापर्यंत सुमारे १५० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित ७७ जागांवर चर्चेच्या पुढील फेरीत निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत २००७ मध्ये शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या; तर भाजपाने २८ जागा आणि काँग्रेसने ७५ जागा जिंकल्या होत्या. २००२ साली निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. २००२ साली शिवसेनेने ९७ जागा आणि भाजपाने ३५ जागा जिंकल्या होत्या; तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, आता शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमधील स्पर्धा आणि कोणता गट वरचढ ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेही मुंबई महापालिका शिंदेंसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
२०१७ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या आणि महानगरपालिकेवरील आपले नियंत्रण कायम ठेवले होते. परंतु, २०२२ मध्ये पक्षात फूट पडली आणि अनेक नगरसेवक, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात सामील झाले, ज्यामुळे अनेक फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील या महापालिकांमध्ये भाजपाचा प्रभाव
मागील वेळी (फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०१८) ज्या २६ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या (आता ही संख्या २९ झाली आहे), त्यात भाजपाला सुमारे १.२० कोटी मते मिळाली. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास, हे प्रमाण ३१.३० टक्के इतके होते. त्या आधीच्या निवडणूक चक्रात (फेब्रुवारी २००९ ते डिसेंबर २०१३) भाजपाला याच महापालिकांमध्ये केवळ ०.२४ कोटी (११.५९ टक्के) मते मिळाली होती. “भाजपाला मिळालेले हे यश केवळ त्यांच्या ताकदीमुळेच नाही, तर विरोधी पक्षांमधील फूट, काँग्रेससारख्या पारंपरिक शहरी पक्षांची कमकुवत झालेली पकड आणि राज्याची व केंद्राची सत्ता स्थानिक पातळीवर संघटनेत रूपांतरित करण्याची भाजपाची क्षमता, यामुळे शक्य झाले आहे,” असे राज्यातील एका विरोधी नेत्याने सांगितले.


