या राज्यात काँग्रेसने आणला भाजपाविरोधात अविश्वास प्रस्ताव!

या राज्यात काँग्रेसने आणला भाजपाविरोधात अविश्वास प्रस्ताव!

-सरकारच्या अडचणी वाढल्या

प्रतिनिधी
हरियाणा : गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही सत्तेत आहे. यादरम्यान हरियाणातील भाजपाचे सरकार मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपाच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे.

काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कथित मतचोरीचा मुद्दा चर्चेत आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधकांच्या इंडिया आघाडीने सत्ताधारी भाजपासह निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उठवली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केले होते. २०२४ मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतचोरी केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावेळी त्यांनी कथित मतचोरीचे पुरावेदेखील दाखवले होते. त्यांच्या या आरोपांमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगासह भाजपाच्या नेत्याने राहुल यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

-१८ डिसेंबरपासून हरियाणा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन

यादरम्यान १८ डिसेंबरपासून हरियाणा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात काँग्रेसने मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी झालेल्या या बैठकीला हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांचीदेखील उपस्थिती होती. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी सत्ताधारी भाजपावर टीकेची तोफ डागली.

भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले…!

“गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. अनेक विधानसभा मतदारसंघात मतचोरी करून भाजपाने राज्यात पुन्हा सत्तास्थापन केली. निवडणुकीपूर्वी मतदारांना विविध प्रलोभने दाखवण्यात आली आणि एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ठिकाणी मतदान करण्यात आले. या सर्व गैरप्रकारांचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे,” असे हुड्डा यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारला कोणकोणत्या मुद्द्यावरून घेरणार?
मतचोरीच्या मुद्द्यापाठोपाठ राज्यातील क्रीडा संकुलांमधील सुविधा व उपकरणांची कमतरता आणि त्यांची दुरवस्था, ऑक्टोबर २०२४ च्या निवडणुकांनंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपाकडून करण्यात आलेला कथित शासकीय यंत्रणांचा वापर हे मुद्दे अधिवेशनात मांडले जाणार आहे. याशिवाय अरवली पर्वत रांगांचे संरक्षण, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, राज्यातील वाढते प्रदूषण, भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांची वाढती समस्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला अधिवेशनात घेरण्याची तयारी केली आहे.

हरियाणातील भाजपाचे सरकार धोक्यात?

राज्यात जातीय द्वेष पसरवणाऱ्या भाजपाच्या आमदार व खासदारांच्या वक्तव्यांवर सभागृहात चर्चा करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जाणार आहे. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि हरियाणा लोकसेवा आयोगाकडून बाहेरील उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिले जात असलेले प्राधान्य या मुद्द्यावरूनही सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जातील, असेही हुड्डा यांनी स्पष्ट केले आहे. सत्ताविरोधी लाट असतानाही भाजपाने गेल्या वर्षीच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. राज्यातील ९० जागांपैकी तब्बल ४८ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. दुसरीकडे काँग्रेसला केवळ ३७ जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर दोन जागांवर इंडियन नॅशनल लोक दलाचे उमेदवार आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.