या महानगरपालिकांमध्ये भाजपाची राष्ट्रवादी, शिंदेसेनासोबत युती नाही
-पुन्हा निवडणुका होणार चुरशीच्या
प्रतिनिधी
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव असणारे भाग मानले जातात. पण या दोन्ही ठिकाणी महायुती होऊ शकणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे राज्यात एकमेकांशेजारी बसून राज्याचा गाडा हाकणारे सत्ताधारी पुणे व पिंपरी चिंचवड या दोन महानगर पालिका निवडणुकांमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले पाहायला मिळणार आहेत. त्याचवेळी या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पुणेकर व पिंपरी-चिंचवडकरांसाठी यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात महानगर पालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार १५ जानेवारी रोजी राज्यातल्या २९ महानगर पालिकांसाठी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यानुसार या २९ महानगर पालिका क्षेत्रांमध्ये सोमवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात कोण कुणासोबत आणि कोण कुणाविरोधात लढणार, या चर्चांना वेग आला आहे.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील पुस्तक प्रदर्शनाला देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महानगर पालिका निवडणुकांबाबत भाष्य केलं. महाराष्ट्रात जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असला, तरी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये महायुती होणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
–आम्ही व अजित पवार एकत्र लढू शकणार नाही
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जिंकण्यासाठीच वेगवेगळे लढण्याचा मुद्दा मांडला. “शिवसेना शक्यतो सर्व ठिकाणी आमच्यासोबत असेल. पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही व अजित पवार एकत्र लढू शकणार नाही. आम्हालाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकमेकांसोबत लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल. त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही. आम्हीच एकमेकांसमोर लढू, पण ही लढत मैत्रीपूर्ण ठेवू”, असं ते म्हणाले.
–अजित पवार म्हणतात, मला माहिती नाही!
एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणार नसल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं असताना अजित पवारांनी मात्र फडणवीस काय म्हणाले ते आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं आहे. “आमची रणनीती निवडणुका लढवण्याचीच असणार. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं हे मला माहिती नाही. पण त्यांनी सांगितलं असेल तर विचार करूनच सांगितलं असेल”, असं अजित पवार म्हणाले.


