हे धक्कादायक! काम देण्याचे बक्षीस म्हणून चक्क मर्सिडीज भेट

हे धक्कादायक! काम देण्याचे बक्षीस म्हणून चक्क मर्सिडीज भेट

– आमदार श्वेता महाले यांचे विधानसभेत गंभीर ताशेरे

प्रतिनिधी

नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सारंगवाडी संग्रह तलाव प्रकल्पात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अनियमितता प्रकरणी एसआयटी चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत केली. आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा उपस्थित करीत ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला होता.

महाले यांनी सांगितले की, वर्ष २००९ मध्ये १६.६१ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचा खर्च आता २८० कोटी रुपयांपर्यंत अर्थात मूळ खर्चाच्या १६ पट वाढला आहे. जीएसटी, भूसंपादन, आणि डिझाइन बदलामुळे किंमत वाढल्याचे कारण दिले जात असले तरी, यामागे भ्रष्टाचार आहे. या प्रकल्पाचा ठेका घेतलेल्या ‘वॉटर फ्रंट प्रायव्हेट लिमिटेड’ या ब्लॅकलिस्टेड कंपनीला उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध तत्कालीन एमडी सुनील कुशिरे यांनी केवळ एका शपथपत्राच्या आधारे अवैध नूतनीकरण करून दिल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

महाले यांनी तत्कालीन एमडी सुनील कुशिरे यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. २०२० मध्ये वॉटरफ्रंट कंपनीकडून कुशिरे यांना पुण्याच्या शोरूममधून मर्सिडीज-बेंझ कार भेट देण्यात आली. दोन वर्षांनंतर ही गाडी त्यांच्या भावाच्या (दिलीप कुशिरे) नावावर करण्यात आल्याचा व्हिडिओ आणि रजिस्ट्रीचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला.

मंत्री राठोड यांनी सारंगवाडी प्रकल्पाची एसआयटी चौकशी गठित करण्याचे आश्वासन दिले. ही चौकशी तीन महिन्यांच्या आत पूर्ण केली जाईल. तपासणीत दोषी आढळल्यास अधिका-याचे निलंबन करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देत सध्या या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे उत्तरात सांगितले.