-शेरो-शायरीचा रोख कुणाकडे?
प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत ज्वलंत आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण भाषणाने झाली. राज्याच्या विकासासाठी त्यांनी सर्वपक्षीय सहकार्याचे आवाहन केले, पण त्याचवेळी विरोधकांकडून झालेल्या टीकेला कवी मनाच्या शब्दांत सडेतोड उत्तर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र विकासाच्या रचनात्मक कामांना गती देत राज्याला पुढे नेण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा स्पष्ट केला. विधानसभेत अधिवेशनाच्या समाप्तीवेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातील निर्धार व्यक्त केला. ‘मी पुढे जात आहे, जातच राहीन, थांबणार नाही.’ हे सांगतानाच
त्यांनी खास शैलीत एक चारोळी सादर केली, जी सभागृहात चर्चेचा विषय ठरली. ते म्हणाले,
‘अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं।’ मुख्यमंत्र्यांनी हे शब्द उच्चारताच याचवेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आमदार जयंत पाटील यांनी ‘आगे’ याचा अर्थ दिल्ली असा घेतला. यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खुलासा करत, महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग किती स्पष्ट आहे, हे दर्शवले. त्यांनी ‘पुढे म्हणजे नागपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास. याचा अर्थ समृद्धी महामार्गातून’…असे स्पष्ट करत विरोधकांच्या अटकळींना पूर्णविराम दिला. या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांचा फोकस केवळ राज्याच्या विकासावर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राजकीय आरोपांचे ‘विष’ पचवून आता रचनात्मक कार्यात लक्ष केंद्रित केले जाईल आणि विकासाच्या मार्गावर न थांबता पुढे वाटचाल केली जाईल. हे भाषण केवळ अधिवेशनाची सांगता करणारे नव्हते, तर महाराष्ट्राला विकासाच्या नवीन टप्प्यावर घेऊन जाण्याच्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरले. तरीही मुख्यमंत्र्यांच्या या शेरो शायरीतून
कुणाला स्पष्ट इशारा होता का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


