मुंबईत शरद पवारांच्या पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळणे कठीण

मुंबईत शरद पवारांच्या पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळणे कठीण

-बदललेली राजकीय परिस्थिती कारणीभूत

प्रतिनिधी
नवी मुंबई : गणेश नाईक यांच्यामुळे कधीकाळी नवी मुंबईच्या राजकीय परिघावर एकहाती अंमल राखणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधी नव्हे इतकी दैना उडाल्याचे चित्र आता पहायला मिळत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असणार्‍या बाजारपेठांमुळे नवी मुंबईत स्थायीक झालेला पुणे, जुन्नर, आंबेगाव, पश्चिम महाराष्ट्रातील एकगठ्ठा मतदार, माथाडी कामगारांच्या वस्त्यांमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा शहरावर राहीलेला प्रभाव आणि साडेबारा टक्के योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुळ आगरी-कोळी मतदारांमध्ये असलेली आपुलकीची जाणीव यामुळे शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग नवी मुंबईत नेहमीच राहीला आहे.

मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत या पक्षाला जिल्हाध्यक्षही मिळणे अवघड झाले असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष रिंगणात उतरुन जेमतेम सव्वा दोन हजार मते मिळविणाऱ्या डाॅ.मंगेश आमले या नवख्या चेहऱ्यावर आता अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गणेश नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांचा भक्कम पाठींबा आणि गणेश नाईक यांचे प्रभावी नेतृत्व यामुळे २००० ते २०१५ या काळात नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकहाती वरचष्मा राहीला. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात नाईक यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतरही २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेवर नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणली.

नरेंद्र मोदी यांचा देशभरातील वाढता प्रभाव, राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालूनही नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईकांचा विजय झाला. पुढे गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करूनही शरद पवार यांच्या पक्षाचा प्रभाव शहरातील काही भागांवर कायम राहीला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर मात्र या पक्षाची नवी मुंबई महापालिका हद्दीत अक्षरश: दैना उडाल्याचे चित्र आहे