मोठ्या राजकीय घडामोडी : हा नेता आमच्यासोबत आल्याने झाला पराभव
-राष्ट्रवादीच्या या नेत्याने दिला राजीनामा
प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षासह कराड पालिकेचे माजी पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपात जाहीर प्रवेश केला. रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेसोबत आल्यानेच आमचा पराभव झाल्याचा दावा केला आहे. महाआघाडीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (आरएलजेपी) बिहार निवडणुकीत महाआघाडीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) जिल्हा अध्यक्ष रेखा खेडेकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षासह कराड पालिकेचे माजी पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. अतुल भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी काँग्रेसचे माजी कराड शहराध्यक्ष, माजी नगरसेवक राजेंद्र माने, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, पालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, संजय कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेशादरम्यान डॉ. अतुल भोसले माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की, कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहराचा विकास व्हावा आणि प्रलंबित प्रश्नांना महायुती सरकारच्या माध्यमातून बळ मिळावे, यासाठी कराड शहरातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पक्ष मजबूत होईल. येत्या काळात असंख्य लोकांना सामावून घेत महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेबरोबर आल्यानेच आमचा पराभव झाल्याचा दावा केला आहे. रामदास आठवले म्हणाले, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल अशी शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडेल. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसोबत आले, पण त्यातून अपेक्षित फायदा झाला नाही. मात्र, विधानसभेत मनसे युतीत नव्हती तेव्हा महायुतीला अधिक जागा मिळाल्या.”
राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना आठवले म्हणाले, “राज ठाकरे आले तरी फारसा फायदा होणार नाही. काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार नाही.” ते पुढे म्हणाले, “नव्या सर्वेनुसार भाजप-शिवसेना (शिंदे गट)-रिपब्लिकन पार्टी महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आमचा फायदाच होईल.”
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) जिल्हा अध्यक्ष रेखा खेडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने या राजीनाम्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) जिल्हाध्यक्ष पदी चिखलीच्या माजी आमदार रेखा खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असतानाच रेखा खेडेकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ला मोठा धक्का बसला आहे. “मी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने देत आहे. कृपया तत्काळ स्वीकारावा,” अशी विनंती त्यांनी केली आहे.


