जागावाटप : या पक्षाला भाजपाने दिले झुकते माफ

जागावाटप : या पक्षाला भाजपाने दिले झुकते माफ

-अनेकांच्या उंचावल्या भुवया

प्रतिनिधी
बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रविवारी जागावाटपाचे सूत्र जाहीर केले. त्यातील २९ जागा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला देण्यात आल्या. भाजपाच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. चिराग पासवान यांना आपल्या राजकीय प्रभावापेक्षा अधिक जागा मिळाल्याचे खुद्द भाजपातील सूत्रांनी मान्य केले आहे. पक्षाच्या या निर्णयामागची कारणेही त्यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत. भाजपाने जागावाटपात चिराग पासवान यांना झुकते माप का दिले? त्याबाबत जाणून घेऊ…

बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध आणि मजबूत ठेवण्यासाठी भाजपाने चिराग पासवान यांना जागावाटपात झुकते माप दिल्याचे भाजपातील एका सूत्राने सांगितले. चिराग पासवान हे राज्यातील दलित समुदायाचे नेते मानले जातात. आगामी निवडणुकीत या समुदायाची मते अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ही मते पक्षापासून दुरावली जाऊ नये म्हणून भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी जागावाटपात तडजोड केल्याचे सांगितले जात आहे.

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग नव्हता. त्यावेळी चिराग पासवान यांनी स्वबळावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला असला तरी अनेक मतदारसंघांमध्ये त्यांनी निर्णायक प्रभाव टाकला होता. लोकजनशक्ती पक्षामुळे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेटचे अनेक उमेदवार पराभूत झाल्याचे आकडेवारीतून समोर आले होते. यंदाच्या निवडणुकीत हा धोका टाळण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने चिराग यांना जागावाटपात झुकते माप दिल्याचे सूत्रांनी सांगितले.