हे ठरले कारण : बिहार निवडणुकीत एनडीएतील हा घटक पक्ष फुटला
-युतीतील फुटीची ही आहे कारणे
प्रतिनिधी
बिहार : बिहारमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या जागावाटपाबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी केली. यामध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल २४३ सदस्यांच्या विधानसभेत प्रत्येकी १०१ जागांवर लढणार आहेत. याचबरोबर एनडीएचा भाग असलेल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना २९ जागा देण्यात आल्या आहेत, तर राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा यांना प्रत्येकी ६ जागा देण्यात आल्या आहेत.
परंतु, हा जागा वाटपाचा फार्म्युला ठरल्यानंतर एनडीएतील मित्रपक्ष असणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युतीतील फुटीची कारणे काय? राजभर यांनी नक्की काय आरोप केले?
सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी बिहारमध्ये स्वतंत्र मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने त्यांच्या पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे ते नाराज आहेत.
राजभर म्हणतात की, त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आत्मसन्मानापोटी घेतला आहे.
‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत राजभर यांनी युतीमध्ये काय बिघडले, त्यांच्या पक्षाची निवडणूक रणनीती काय आहे आणि बिहारमधील त्यांचा पक्षाचा प्रचार कोणत्या मुद्द्यांवर आधारित असेल, याविषयी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने त्यांच्या पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे ते नाराज आहेत.
ओम प्रकाश राजभर यांनी म्हटले, “मी सर्व प्रयत्न केले. बिहारपासून दिल्लीपर्यंत याविषयी प्रयत्न झाले; पण जेव्हा जागावाटपाची यादी जाहीर झाली, तेव्हा आमच्या उमेदवारांचा त्यात अजिबात समावेश नव्हता. आम्ही महिनो न महिने जमिनीवर काम केले असतानाही, त्यांनी आम्हाला विचारात न घेता यादी प्रसिद्ध केली. आम्ही ३२ जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहोत, तरीही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.” ते पुढे म्हणाले, “१९५२ पासून कोणत्याही राजकीय पक्षाने बिहारमध्ये राजभर समाजाचा एकही आमदार दिला नाही. आम्हाला केवळ ‘प्रतीकात्मक भागीदार’ म्हणून किती दिवस वागवणार? त्यामुळेच आम्ही ही लढाई स्वतःच्या बळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.


