हे ठरले कारण : बिहारमध्ये मित्रपक्ष सोडणार साथ
-राष्ट्रीय राजकारणाच्या समीकरणावर परिणाम
प्रतिनिधी
बिहार : बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचा राष्ट्रीय राजकारणाच्या समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून धुसफूस होत असल्याचे समोर आले आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासह केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून सूचक पोस्ट केल्या आहेत, त्यामुळे बिहारच्या निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
जीतन राम मांझी यांची सूचक पोस्ट
जीतन राम मांझी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी कवितेच्या माध्यमातून सूचक इशारा दिला. “हो न्याय अगर तो आधा दो, यदि उसमें भी कोई बाधा हो, तो दे दो केवल १५ ग्राम, रखो अपनी धरती तमाम, HAM वही खुशी से खाएंगें, परिजन पे असी ना उठाएंगे।” असे मांझी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. इतकेच नव्हे तर पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मांझी यांनी जागावाटपावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. हिंदुस्थानी अवाम पक्षाला १५ पेक्षा कमी जागा मिळाल्यास आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
– जीतन राम मांझी म्हणाले….
“बिहारच्या राजकारणात पदार्पण करून आमच्या पक्षाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. असे असले तरीही पक्षाला अद्यापही अधिकृत मान्यता मिळाली नाही, त्यामुळे पक्षाला मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक तेवढ्या जागांची आमची मागणी आहे. कुणाला किती आणि कोणत्या जागा मिळतील याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. १० ऑक्टोबरच्या आत त्या संदर्भातील निर्णय होईल”, असे जितनराम मांझी म्हणाले. “राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आमच्या पक्षाला अपमानित वाटत आहे. आम्हाला कोणत्याही बैठकांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. आणखी किती काळ आम्ही हा अपमान सहन करणार, मी नेहमीच एनडीएला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांनीही आमच्या पक्षाचा सन्मान ठेवायला हवा,” असेही जीतन राम म्हणाले.


