महायुतीचा हा नेता टार्गेट : वैयक्तिक आरोप, टीकाटिप्पणी

महायुतीचा हा नेता टार्गेट : वैयक्तिक आरोप, टीकाटिप्पणी

-मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंची दांडी

प्रतिनिधी
मुंबई : महायुती भक्कम असून आमच्यात काहीही बेबनाव नाही, अशी ग्वाही तिन्ही पक्षांचे नेते देत असले तरी स्वातंत्र्यदिनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद तर समोर आला.

भाजपचे मंत्री, आमदार वा स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक आरोप वा टीकाटिप्पणी केली. शिंदे यांना भाजपकडून वैयक्तिक लक्ष्य करण्यात आल्याने यामागे काही वेगळी खेळी तर नाही ना, अशी शंका शिंदे गटाच्या नेत्यांना येऊ लागली आहे.

राज्यातील भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात फारसे सख्य नसल्याचे वारंवार अनुभवास येते. गेल्याच आठवड्यात तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या भेटीत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा आहे. त्यानंतर ध्वजारोहणसाठी रायगडमध्ये आदिती तटकरे यांनाच संधी देण्यात आल्याने शिंदे व त्यांचे मंत्री भरत गोगावले नाराज झाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदे उपस्थित नव्हते.

गणेश नाईक यांच्याकडून टीका
एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली होती. त्याचा आनंद आहे. पण कमाविलेले टिकविता आले पाहिजे असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये केले. कसे कमविले, किती कमविले आणि कसे टिकविले यावर जनसामान्यांची नजर असते असाही उल्लेख त्यांनी केला. या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.