काँग्रेसला उभारी : नागपुरातील यांना मिळाले स्थान
-सुमारे ४०० जणांचा समावेश
प्रतिनिधी
नागपूर : प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अ. भा. काँग्रेस समितीच्या मान्यतेनंतर प्रदेश काँग्रेसची सुमारे ४०० जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदींचा राजकीय व्यवहार समितीत समावेश करण्यात आला आहे. अनंत गाडगीळ, सचिन सावंत, अतुल लोंढे, माजी आमदार धिरज देशमुख व गोपाळ तिवारी या पाच जणांची ज्येष्ठ पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माध्यम समन्वयक म्हणून श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे जाबदारी सोपविण्यात आली आहे.
राजकीय व्यवहार समितीत ३८ ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष (१६), उपाध्यक्ष (३८), सरचिटणीस (१०८), सचिव (९५), कार्यकारी समिती (८७) अशी खोगीर भरती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसची १०० ते १२५ जणांची शक्यतो कार्यकारिणी पूर्वी असायची. यंदा सर्व पदांवर अनेकांना संधी देण्यात आली आहे. पूर्वी पाच ते सहा सरचिटणीस असायचे. नंतर ही संख्या वाढविण्यात आली. यंदा तर १०८ सरचिटणीसांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यातील पक्षाच्या सर्व खासदार व आमदारांचा कार्यकारी समितीवर समावेश करण्यात आला आहे. खासदार शाहू महाराज, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर, सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख आदींची कार्यकारी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे विविध नेत्यांच्या मुलांची वर्णी लावण्यात आली आहे. प्रदेश खजीनदारपदाची जबाबदारी पुण्याच्या अभय छाजेड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राजकीय व्यवहार या सर्वोच्च समितीचे समन्वयक म्हणून ॲड. गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.