हे ठरले कारण : राज्याच्या या कृषिमंत्र्यांची जाणार विकेट

हे ठरले कारण : राज्याच्या या कृषिमंत्र्यांची जाणार विकेट

-विधान परिषदेत ऑनलाइन पत्ते खेळतअसल्याचे प्रकरण

प्रतिनिधी
मुंबई : सतत शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता विधान परिषदेत ऑनलाइन पत्ते खेळत असल्याच्या चित्रफितीवरून अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली नाराजी, तर पक्ष त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेईल ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका यातून कोकाटे यांची गच्छंती अटळ मानली जाते.

कोकाटे यांच्या ऑनलाइन पत्ते खेळतानाच्या आणखी दोन चित्रफिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारित केल्या. तत्पूर्वी आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांची भ्रमणध्वनीवर पत्ते खेळतानाची चित्रफीत प्रसारित केली होती. कोकाटे यांनी आपण पत्ते खेळत नव्हतो, असा खुलासा केला असला तरी एकूण तीन चित्रफितींवरून कोकाटे हे विधान परिषद सभागृहात रमी खेळत असल्याचे स्पष्ट होते. कोकाटे हे सभागृहात रमीच्या माध्यमातून ऑनलाइन जुगार खेळत होते, असा आरोप विरोधकांनी केला.

कोकाटे यांच्या वर्तनावरून सर्व थरांतून टीका होत आहे. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्ये केल्याने कोकाटे हे आधीच अडचणीत आले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) कुचंबणा झाली आहे. यापूर्वीच्या विधानांवरून अजित पवार यांनी समज देऊनही कोकाटे यांच्या वर्तनात बदल झालेला नाही. कृषिमंत्री म्हणून कोकाटे यांना फारशी छाप पाडता आलेली नाही वा खात्यावर त्यांचा प्रभाव दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांची गच्छंती केली जाऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीच्या गोटातून दिले जात आहेत.