-पक्षाच्या अंतर्गत मोठे फेरबदल
प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या महत्त्वाच्या बंगाल निवडणुकीपूर्वी भाजपा तयारीला लागली आहे. पक्षाच्या अंतर्गत मोठे फेरबदल केले जात आहेत. संघटनात्मक रचनेत बदल केले जात असून राज्यस्तरावर नियुक्त्या केल्या जात आहेत. लवकरच भाजपा पुढील प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा करणार आहे. २०२४ च्या लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजपामध्ये धोरणात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे. नेमके कोणते बदल करण्यात येणार आहेत? आगामी निवडणुकांसाठी भाजपा काय तयारी करत आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.
फेरबदलाचे कारण काय?
२०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये भाजपाच्या जागांमध्ये घट पाहायला मिळाली.
असे असले तरी वरिष्ठ केंद्रीय नेते या निकालाला संधी म्हणून पाहत आहेत.
भाजपातील सूत्रांनी सांगितले की, पक्षांतर्गत बदल करण्यात येणार आहे आणि त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.
“२०२१ मध्ये पक्षाने ७७ विधानसभा जागा जिंकल्या होत्या.
गेल्या वर्षीच्या मतमोजणीत नेत्यांना एक पॅटर्न लक्षात आला आहे.
अनेक ठिकाणी आम्ही फक्त ३,००० ते ४,००० किंवा त्याहूनही कमी मतांनी हरलो आहे, हा पराभव नाही,” असे पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘न्यूज १८’ला सांगितले.
वरिष्ठ नेते त्या दिशेने काम करत आहेत. विशेषतः धार्मिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरणाकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. मंदिरांना भेटी देणे, रामनवमीवर लक्ष केंद्रित करणे आणि शाखा व स्थानिकांच्या सहाय्याने कार्यक्रम आयोजित करून तळागळातील लोकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका भाजपा नेत्याने यावर म्हटले, “आम्ही २०२४ ला शेवट म्हणून पाहत नाही. आम्ही आमच्या लक्षाच्या किती जवळ पोहोचलो ही त्याची झलक आहे.” केंद्रीय नेतृत्वदेखील पश्चिम बंगालच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ते राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संघांमधील समन्वय आणि तरुण नेतृत्वाचा समावेश यासाठी प्रयत्न करत आहेत. जर भाजपाचे अंतर्गत गणित बरोबर राहिले तर प्रत्येक विभागात त्यांची हजार मते वाढण्याची शक्यता आहे.