आघाडीला मोठा धक्का: निवडणुकीपूर्वीच या राज्यात तिढा

आघाडीला मोठा धक्का: निवडणुकीपूर्वीच या राज्यात तिढा

-जुन्या मित्रपक्षाने केली बाहेर पडण्याची घोषणा

प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून भाजपाने आपला राजकीय दरारा कायम ठेवला. आता पक्षाचे पुढील लक्ष्य यावर्षीच्या अखेरीस होणाऱ्या बिहारच्या निवडणुकीवर आहे. महाराष्ट्र, हरियाणा व दिल्लीमध्ये भाजपाच्या विजयामुळे निर्माण झालेल्या गतीवर स्वार होऊन, एनडीएनं बिहारमध्ये २४३ पैकी २२५ जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं आहे. मात्र, त्याआधीच राज्यात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचा जुन्या मित्रपक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

पशुपती पारस यांनी भाजपाची साथ का सोडली?
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख पशुपती पारस यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बिहारमधून एकही तिकीट न मिळाल्यामुळे आमच्या पक्षाचा अपमान झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपाची साथ सोडल्यानंतर पशुपती पारस हे राष्ट्रीय जनता दल नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय जनता दलातील एका सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाआघाडीकडून राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाला काही जागा सोडल्या जाऊ शकतात. पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आतापर्यंत बिहारच्या एकाही निवडणुकीत भाग घेतलेला नाही, मात्र तरीही ते चिराग पासवान यांच्या मतदारांवर परिणाम करतील, अशी आम्हाला आशा आहे. चिराग पासवान यांच्या पक्षाचा पासवान समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी निवडणुकीत वेळोवेळी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली आहे,” असे आरजेडीच्या एका नेत्याने सांगितले.

spot_img