महाराष्ट्राचे भावनिक राजकारण संपलेय का ? बारामतीत ५५ उमेदवार

महाराष्ट्राचे भावनिक राजकारण संपलेय का ? बारामतीत ५५ उमेदवार

-करुणा धनंजय मुंडे रिंगणात

प्रतिनिधी
पुणे : बारामतीत कोणतीही निवडणूक असली तरी निकाल काय लागणार, हे माहीत असल्याने उमेदवारांना माघार घेण्यासाठी विनवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र, यावेळची स्थिती ही निराळी असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्याची चर्चा सुरू होताच उमेदवारांची संख्या आणखी वाढली आहे. थोडेथोडके नव्हे; तर ५५ उमेदवार असून, हे उमेदवार आले कोठून? याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस’ मराठीतील अभिजित बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. सुरुवातीपासून ही निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे उमेदवारांची संख्या ही वाढत गेली. सहा एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. तोपर्यंत तब्बल ५५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये १४ जण हे बारामतीतील स्थानिक उमेदवार आहेत. मात्र, अन्य उमेदवार हे बारामतीबाहेरील आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड आणि इंदापूरमधील दोन उमेदवार आहेत. अन्य उमेदवार हे सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, बीड आदी भागांतील आहेत. त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी ‘स्वराज्य शक्ती सेना’ या पक्षाच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. साताऱ्यातील अभिजित बिचुकले यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यांच्यासह ५५ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

बारामती विधानसभा मतदार संघाच्या २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते. तेव्हा ४६ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी चार अर्ज हे छाननीमध्ये बाद झाले. नऊ जणांनी माघार घेतली. त्यामुळे २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले होते. आता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर ५५ पैकी किती उमेदवार माघार घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या मतदारसंघात आलेल्या उमेदवारी अर्जांची आज (७ एप्रिल) छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारपर्यंत (९ एप्रिल) मुदत देण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास २३ एप्रिल रोजी मतदान आणि चार मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

या मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी नऊ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर हरकती आणि सूचना घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार तीन लाख ८३ हजार ७६७ मतदार झाले आहेत. प्रारुप मतदार यादीत तीन लाख ८८ हजार ३७१ मतदार होते. त्यामुळे ७७६३ मतदार हे कमी झाले आहेत. या मतदारांना मतदानाची संंधी मिळणार की, निवडणूक बिनविरोध याबाबतचे चित्र नऊ एप्रिल रोजी स्पष्ट होईल.