हे आहे कारण : केरळच्या रणागंणासाठी विदर्भातील फौजफाटा
-भाजपा नेत्यांची फळी रवाना
प्रतिनिधी
नागपूर : वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसाचे २४ तास निवडणूक मोडमध्ये राहणारा पक्ष अशी भाजपची ओळख निर्माण झाली आहे. सत्तेत आल्यानंतर झपाट्याने विस्तारलेला हा पक्ष सदस्य नोंदणीच्या आधारावर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करतो. कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी विविध निवडणुकांमध्ये त्यांना गुंतवून ठेवले जाते.
राज्यातील निवडणुका संपल्या की कार्यकर्त्यांना इतर राज्यांत प्रचारासाठी पाठविले जाते. सध्या दक्षिण भारतातील केरळ राज्यात हऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी विदर्भातील भाजपच्या अनुभवी नेत्यांची कुमक रवाना झाली आहे.
पूर्व विदर्भातील भाजप कार्यकर्ते प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे प्रचारासाठी जात असत, कारण या प्रदेशांशी विदर्भाचे ऐतिहासिक व सामाजिक संबंध आहेत. मात्र आता भाजपने दक्षिण भारतात, विशेषतः केरळ मध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कारण केरळमध्ये भाजपची राजकीय घुसखोरी आतापर्यंत मर्यादित राहिली आहे. अशा परिस्थितीत बाहेरील राज्यांतील नेत्यांना प्रचारात उतरवून ‘निवडणूक व्यवस्थापन कौशल्य’ स्थानिक पातळीवर रोवण्याचा प्रयत्न या माध्यमातूनकेला जात आहे.
विदर्भातील नेत्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती ही याच रणनीतीचा भाग आहे. विदर्भात भाजपने गेल्या दशकात मजबूत संघटन उभारले असून, निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेले कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. त्यामुळे या ‘कॅडर एक्सपोर्ट’ मॉडेलद्वारे भाजप केरळमध्ये आपली निवडणूक यंत्रणा अधिक परिणामकारक बनवू पाहत आहे. विशेषतः नागपूर येथील नेत्यांवर दिलेली जबाबदारी ही याच दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.
केरळच्या १४० विधानसभा जागांसाठी नागपूरमधील भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांकडे केरळमधील महत्त्वाच्या मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली असून, हे सर्व नेते सध्या केरळमध्ये पूर्णवेळ ठाण मांडून बसले आहेत.महाराष्ट्रातील ८७ नेते १४० पैकी ८१ विधानसभा क्षेत्रात आपले निवडणूक कौशल्य पणाला लाऊन पूर्णवेळ काम करत आहेत, यात नागपूरच्या नेत्यांचाही समावेश आहे. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके हे तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील ‘कझकूटम’ विधानसभा मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. माजी आमदार अनिल सोले यांच्याकडे ‘नेयाट्टीनकारा’ विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे, तर माजी आमदार गिरीश व्यास हे ‘नेमम’ विधानसभा मतदारसंघात गेले आहेत.
तसेच आमदार परिणय फुके यांच्याकडे ‘पुनजर’ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. विदर्भातील आर्वीचे आमदार सुमित वानखेडे,गडचिरोली चे आमदार मिलींद नरोटे,वरोरा चे आमदार करण देवतळे,चिखलीच्या आमदार श्वेता महल्ले,अकोलाचे आमदार रणजीत पाटील,धामणगाव रेल्वे चे आमदार प्रताप अडसड यांच्याकडेही तेथील विविध विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे विशेष म्हणजे केरळमध्ये गेलेल्या आमदारांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासून आमदारांची संख्या अधिक आहे. स्वत: मुख्यमंत्री तेथे प्रचारसभा घेत आहेत हे येथे उल्लेखनीय.


