नागपुरात ठाकरेंनी का केले फडणवीसांच्या गृहखात्याला टार्गेट
-फडणवीस-ठाकरे’ या दोघांची मैत्री राजकारणातील अतूट जोड
प्रतिनिधी
नागपूर: २०१४ नंतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागते,अशी धारणा राजकीय वर्तुळात अनेकदा व्यक्त केली जाते. तपास यंत्रणांचा ससेमिरा, कारवाईची भीती आणि राजकीय दबाव यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्याची हिमंत कोणी दाखवत नाही. त्यात जर ते मुख्यमंत्री असेल तर न बोललेले बरे.अशा स्थितीत विरोधकांची कोंडी झालेली, बोलले तर कारवाई गप्प राहिले तर सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधल्याचा आरोप. नागपूरचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे हे त्यापैकीच एक. एकीकडे मुख्यमंत्र्यांशी मैत्री, दुसरीकडे राजकारणात विरोधकाची भूमिका. आजवर हे संतुलन लिलया सांभाळत आलेल्या ठाकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात थेट मुख्यमंत्री सांभाळत असलेल्या गृहखात्यालाच लक्ष्य केले. त्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत.
‘फडणवीस-ठाकरे’ या दोघांची राजकारणातील सुरूवात महापालिकेतून झाली. दोघेही महापौर राहून चुकलेले. दोघेही परस्परांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढलेले. तरी राजकीय कटुता निर्माण होऊ न देणारे. सध्या ज्या पश्चिम नागपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व ठाकरे करतात, तो पूर्वी फडणवीस यांचा. तेथून ते दोनदा निवडणूक जिंकलेले. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस राजकीय संघर्ष नेहमी पेटलेलाच. तरीही ठाकरे-फडणवीस स्नेहसंबंध कायम, त्यामुळेच त्याची नागपूरच्या राजकारणात नेहमी चर्चा होते. याचा फटका ठाकरेंना नेहमीच बसतो. ते भाजपमध्ये जाणार असे आरोप त्यांच्याच पक्षातील विरोधक सातत्याने करतात.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही याचीच री ओढण्यात आली होती. पण ठाकरे यांनी त्याला कधीच किमंत दिलेली नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनातही नागपूरचे प्रश्न मांडतांना ठाकरे यांनी नेहमीच त्यांच्या मित्राला सांभाळून घेतल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले. या उलट ‘मित्रा’च्या पक्षांतर्गत विरोधकाला कोंडीत पकडण्यासाठी ठाकरे यांनी केलेले प्रयत्नही लपून राहिलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी विधानसभेत नागपूरच्या गुन्हेगारीवरून गृहखात्यावर घणाघाती टीका करणे राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडणारे ठरले आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी नोंदवलेले गंभीर गुन्हे, एकतर्फी केलेली कारवाई हे या मागचे कारण मानले जात आहे.
-आमदार विकास ठाकरे म्हणाले…!
अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना विकास ठाकरे यांनी नागपूर पोलिसांच्या कामकाजावरही तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात काही ठिकाणी पोलीस कर्मचारीच सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी वाद घालतात असा आरोप करताना त्यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी आरोपीने सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याच्या घटनेचे उदाहरण दिले. . काही प्रकरणांमध्ये दुकानांचे ताबे मिळवून देण्यासाठी पोलीस ‘सुपारी’ घेतात, असा गंभीर आरोप केल
एकेकाळी नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी, टायगर कॅपिटल, कोळसा राजधानी, ऑरेंज सिटी अशा सकारात्मक ओळखीने ओळखले जात होते.• मात्र दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत नागपूरला ‘ड्रग्स कॅपिटल’ अशी नकारात्मक ओळख जोडली जात आहे. गांजा, मेफेड्रोन, अफू, चरस तसेच विविध सिंथेटिक ड्रग्स नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. प्रत्यक्षात नागपूरमधूनच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये या प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे चित्र दिसून येते.• नागपूर पोलिसांनी राबवलेले ‘ऑपरेशन थंडर’ मध्ये मार्च २०२४ ते जून २०२५ या कालावधीत सुमारे ५४० ड्रग्स प्रकरणे नोंदविण्यात आली आणि ७३० जणांना अटक करण्यात आली. मात्र मार्च २०२४ पूर्वी आणि जून २०२५ नंतर अशा प्रकारची व्यापक कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.फक्त एका वर्षात ५४० ड्रग्स प्रकरणे आणि ७३० अटक अधिकृतपणे नोंदली गेली असतील, तर नागपूरमधील परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना करता येते.असा सवाल ठाकरे यांनी केला.
ठाकरे यांनी नागपूर मध्ये वाढलेल्या गुन्हेगारीचे काही आकडे सादर केले, त्यांच्या मते दरवर्षी सरासरी सुमारे २०० बलात्कार आणि ५०० छेडछाडीच्या घटना नोंदवल्या जातात. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आकडा आहे. दरवर्षी नागपूरमध्ये सुमारे १,५०० गंभीर गुन्हे नोंदवले जातात.यावरून पोलिसांची कार्यपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे, असा आरोप त्यांनी केला.


