काय आहे प्रकरण? शिंदेंना फोन करण्याचा ठाकरेंना सल्ला

काय आहे प्रकरण? शिंदेंना फोन करण्याचा ठाकरेंना सल्ला

-या खासदाराने दिला खोचक सल्ला

प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर जायचे असल्यास त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा, असा खोचक सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी दिला.मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून अकोल्यात काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट झाला असून महानगर उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. आमदार रोहित पवार यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चुकीची विधाने करू नये, असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. राज्य सरकारच्या कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर जायचे असल्यास त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा, असा खोचक सल्ला शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिला. संजय राऊत यांच्यामुळेच ठाकरेंवर ही वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे ते पुन्हा आमदार होणार की नाही, याबद्दल विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली जात आहे. त्यावरून शिंदे गटातील नेत्यांनी ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यांवर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले होते, त्यावेळीही उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन न करता थेट मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, अशी आठवण नाईक यांनी करून दिली. काही लोक प्रसिद्धीसाठी असे बोलतात, असा चिमटाही त्यांनी शिंदे गटाला काढला.

महायुतीतील आणखी एक मंत्री अडचणीत?
मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी चौकशीची मागणीही केली. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रात संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खासगी सचिव भरत कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागात अलीकडील काळात गंभीर अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः विविध योजनांमधील निधी वितरण प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृह व वसतिगृहाशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन निविदा प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचे वाटप करण्यात आले असल्याचे जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.