या राज्यात पतंगीच्या मांज्याने गळा कापल्यास खुनाचा गुन्हा दाखल

या राज्यात पतंगीच्या मांज्याने गळा कापल्यास खुनाचा गुन्हा दाखल

-मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश

प्रतिनिधी
वी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये चिनी मांजामुळे एका ३६ वर्षीय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा गळा कापला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मोठे आदेश दिले आहेत. त्यांनी यापुढे मांजामुळे होणाऱ्या मृत्यूच्या सर्व घटनांमध्ये ‘हत्येचा’ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्यभरात या जीवघेण्या मांजाच्या विक्रीवर नियंत्रण न मिळवू शकणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या घटनेची दखल घेतल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले आहे.

-योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात व्यापक मोहीम राबवून चिनी मांजाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आणि तो विकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “चायनीज मांजावर पूर्णपणे बंदी आहे आणि तरीही तो सहज मिळणे ही गंभीर चिंतेची बाब आहे,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना छापे टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेदरम्यान केवळ विक्रीवरच नव्हे, तर चायनीज मांजाची साठवणूक आणि वाहतुकीवरही कडक नजर ठेवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

चायनीज मांजाची ‘सप्लाय चेन’ (पुरवठा साखळी) पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी राज्यव्यापी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या मोहिमेची प्रगती आणि घेतलेल्या कारवाईचा उच्च स्तरावर नियमित आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. योगी आदित्यनाथ म्हणाले, “सार्वजनिक सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. चिनी मांजा वापरणे हा केवळ कायदेशीर गुन्हा नसून सर्वसामान्य जनता, मुले आणि पशू-पक्ष्यांसाठी जीवघेणा धोका आहे. राज्याला या धोकादायक मांजापासून पूर्णपणे मुक्त करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे,” असे योगी म्हणाले.