राष्ट्रवादीची चिंता पवारांनी वाढविली : काय आहे नेमके कारण ?
-एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत
प्रतिनिधी
मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. विलीनीकरणाच्या चर्चेपासून शरद पवारांनी स्वतःला दूर ठेवले असले तरी विलीनीकरण झाल्यास शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात इंडिया आघाडीतील नेत्यांनीही विलीनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विलीनीकरण झाल्यास शरद पवार गट इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) एका वरिष्ठ नेत्याने यावर बोलताना प्रश्न केला आणि म्हटले की, “यात आम्ही काय करू शकतो? दोन्ही गट आणि पवार कुटुंबालाच याबाबत निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबातील एका वरिष्ठ सदस्याचे निधन झाले आहे, त्यामुळे आम्ही सध्या या विषयात ढवळाढवळ करू इच्छित नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि जशी परिस्थिती बदलेल तसे पाऊल उचलू.”
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचे धक्कादायक वृत्त येण्यापूर्वी ८ फेब्रुवारीलाच राष्ट्रवादीचे दोन्ही गट विलीनीकरणाची घोषणा करणार होते. भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्याने असेही म्हटले की, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडणे हा मोठा फटका नसेल. “एखाद्याच्या जाण्याचा युतीवर सकारात्मक परिणामही होऊ शकतो. राजकारण इतके गतिमान आहे की आधीच अंदाज वर्तवणे कठीण आहे, असे त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. विलीनीकरणाच्या चर्चेपासून शरद पवारांनी स्वतःला दूर ठेवल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य एकत्रीकरणावर पुन्हा एकदा शंका निर्माण झाली आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांमधील महत्त्वाचा दुवा असलेले अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर आता पक्षांतर्गत मतभेद स्पष्टपणे समोर आले आहे.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातील नेते विलीनीकरणाची चर्चा प्रगत टप्प्यावर असल्याचे सांगत असले, तरी शरद पवारांच्या वक्तव्यावरून ही प्रक्रिया थांबल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे, महत्त्वाचे निर्णय आता त्यांच्या गटाला विश्वासात न घेताच घेतले जात असल्याने कुठेतरी त्यांची नाराजी असल्याचे चित्र आहे. सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची अंतर्गत बाब असून त्याबाबत आपल्या गटाशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या टिप्पणीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीत विलीनीकरणाबाबत असलेला विरोध उघड झाला आहे. राष्ट्रवादीतील एका गटाला विलीनीकरण नको आहे, कारण त्यांना स्वतःचे अधिकार, सरकारमधील स्थान आणि पक्षावरील नियंत्रण गमावण्याची भीती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांची चिंता वाढली आहे.


