भाजपाने गेम फिरविला : दोन पक्ष एक होण्यापूर्वी बनविला उपमुख्यमंत्री
-पवारांची ताकद वाढू नये म्हणून खेळी
प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे भाजपला सत्ता मिळविण्यात अनेकदा अडथळे आल्याने भाजपने यावेळी सावधगिरी बाळगत सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपद देण्याचा मार्ग अनुसरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा निर्णय होण्याआधीच अजित पवार यांच्या पक्षाची सूत्रे त्यांच्या हाती देण्याबाबत पावले उचलण्यात आली.
पवार यांनी भाजपच्या राज्यातील सत्तेमध्ये अनेकदा अडथळे आणले व भाजपला तोंडघशी पाडले. शिवसेनेशी युती तुटल्यावर २०१४ मध्ये राज्यात सत्तेवर येण्यासाठी भाजपला काही आमदार कमी पडले होते. तेव्हा शिवसेनेने त्यांच्याबरोबर सत्तेत जावू नये, यासाठी भाजपने न मागताच पवार यांनी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते, असे पवार यांनीच नंतर जाहीरपणे सांगितले. युतीमध्ये कलह वाढल्यावर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्यास तयार होते. पण शिवसेना सरकारमध्ये असताना त्यात सामील होण्यास पवार यांनी विरोध केला होता. त्यामुळे भाजपची पंचाईत झाली होती.
भाजप-शिवसेना युतीला २०१९ मध्ये बहुमत मिळाल्यावर पवार यांच्या पुढाकाराने उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मार्ग अनुसरला आणि भाजपची साथ सोडून सरकार स्थापन केले. पवार यांनी काँग्रेसला सरकारमध्ये सामील होण्यासाठी तयार केले होते. त्यावेळी पवार यांच्याशी चर्चा करून सरकार स्थापनेच्या बाबी ठरल्या. पण पवार यांनी भाजपला बाजूला ठेवून महाविकास आघाडीबरोबर जाणे पसंत केले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास पवार यांच्यामुळे काढून घेतला गेला होता.
-लोकसभा निवडणुकीतही फटका
शरद पवार यांनी आतापर्यंत भाजपविरोधातच राजकारण केले. देशपातळीवर इंडिया आघाडीत सामील झाले. राज्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका लढविल्या आणि राज्यात भाजपला मोठा फटका बसला. भाजपच्या सत्तामार्गात पवार यांच्यामुळे अनेकदा अडचणी आल्याने भाजपने आता शरद पवार यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे ठरविले आहे. अजित पवार हे भाजपबरोबर आल्याने सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे ठेवून शरद पवार यांची ताकद वाढू न देण्याची राजकीय खेळी भाजपने केली आहे.


