सरकारचे ठरले : एकाचवेळी निवडणुका होणार या वर्षात
– या नेत्याने स्पष्टचं सांगितले
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपाचे खासदार व एक राष्ट्र, एक निवडणुकीशी संबंधित विधेयकांवरील संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी म्हटलं आहे की “विद्यमान विधेयकांतर्गत एकाच वेळी संपूर्ण देशात निवडणुका घेण्याची सर्वात जवळची तारीख ही २०३४ आहे. आमची समिती मसुदा कायद्याच्या पलीकडे जाऊन एकत्र निवडणुका घेण्याची शिफारस करू शकते”.
पी. पी. चौधरी यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की समिती कधीपर्यंत अशी शिफारस करू शकते? किंवा समितीला त्यांच्या शिफारशी निश्चित करण्यासाठी किती वेळ लागेल? यावर ते म्हणाले, “समिती सदस्यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना भेट देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला दोन ते अडीच वर्षे लागतील. समितीने आतापर्यंत महाराष्ट्र व उत्तराखंड या दोन राज्यांना भेट दिली आहे”.
एक राष्ट्र एक निवडणुकीसंदर्भातील विधेयके गेल्या वर्षी लोकसभेत सादर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयके चौधरी यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे पाठवण्यात आली होती. यावर आता चर्चा चालू आहे. लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी मुसद्यात वेगवेगळ्या उपाययोजनांची तरतूद केली असली तरी समिती इतरही काही शिफारसी करू शकते. रचनात्मक अविश्वास मतदान हे त्यापैकी एक उदाहरण आहे. यामध्ये जर्मनीप्रमाणे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या विधीमंडळ सदस्यांकडे (विरोधी पक्ष) सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ असलं पाहिजे.