या भाजपा नेत्याला पोलीसच म्हणतात, स्वसंरक्षाणार्थ बुलेटप्रूफ वाहन वापरा
-वारंवार येत आहेत धमक्या
प्रतिनिधी
हैदाराबाद : हैदराबादमधील मंगलहाट पोलिसांनी भाजपा आमदार ठाकूर राजा सिंह यांना औपचारिक नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये त्यांना राज्याद्वारे मंजूर सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्याविरोधात इशारा देण्यात आला आहे. त्यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने पोलिसांनी त्यांना अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी बजावली नोटीस
१ जूनला बजावण्यात आलेल्या नोटिशीमध्ये गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार ठाकूर राजा सिंह यांना सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना बुलेटप्रूफ वाहन वापरण्याचे आणि चार नियुक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या नोटिशीमध्ये, “पुन्हा एकदा तुम्हाला बुलेटप्रूफ वाहनाचा वापर करून स्वतःचे संरक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे. सरकारने नियुक्त केलेल्या (१+४) सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वापर करावा”, असेही म्हटले आहे. त्यामध्ये सिंग यांच्या जीवाला धोका असल्याच्या चिंतेचा उल्लेख करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांना वारंवार धमकीचे कॉल येत आहेत; परंतु तरीही ते त्यांच्याबरोबर संरक्षकांना न घेताच संवेदनशील भागांतून फिरत आहेत आणि त्यामुळेच खबरदारीच्या उपाययोजनांचे उल्लंघन होत होते. “तुम्हाला पुन्हा एकदा इशारा देण्यात येत आहे की, तुम्हाला वारंवार धमकीचे कॉल येत आहेत आणि आमच्या असे लक्षात आले आहे की, तुम्ही अनेकदा कोणत्याही सुरक्षा कर्मचाऱ्याशिवाय निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पडत आहात. तसेच सांप्रदायिकरीत्या अत्यंत संवेदनशील भागात फिरत आहात. त्यातून तुमचे जीवनाप्रति आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते,” असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.