स्पष्ट बोलले : मुख्यमंत्री फडणवीसांची जातनिहाय जनगणणेवरून प्रतिक्रिया
-सामाजिक न्यायाचे येईल पर्व
प्रतिनिधी
नागपूर / मुंबई : मागील अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत होती. आता केंद्र सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयामुळे समाजिक न्यायाचं नवं पर्व सुरू झालं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मोदी सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे. भारतात १९३१ नंतर पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होणार आहे. याआधी मनमोहन सिंग यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना करणार असा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळामधून विरोध झाल्यामुळे त्या निर्णयाला त्यांनी एसीसीमध्ये त्यांनी बदललं आणि जातनिहाय जनगणना करण्याऐवजी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सर्व्हे केला. पण त्याचेही आकडे कधीच प्रकाशित झाले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“शेवटच्या घटकापर्यंत जर सामाजिक न्याय पोहोचवायचा असेल तर जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून समाजात कोण मागे राहिलेलं आहे. याचा इम्पिरिकल डेटा देखील समोर येईल. त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशातील समाजांना पुढे घेऊन जाता येईल. या अनुषंगाने हा ऐतिहासिक निर्णय आहे”, असंही फडणवीस यांनी म्हटले आहे.