भाजपाच्या या आमदारांची आपल्याच सरकारवर टीका
-थेट मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी
मध्य प्रदेश : मध्य प्रदेश भाजपामध्ये पक्षांतर्गत काही मुद्द्यांवरून सध्या तणावाचे वातावरण आहे. भाजपा आमदारांच्या एका गटात आणि पक्षाच्या नेतृत्वात तणाव वाढत आहे. स्थानिक मुद्द्यांवरून काही आमदार राज्य सरकारवर जाहीर टीका करीत आहेत. पिछोर येथील आमदार प्रीतम लोधी, सोहागपूर येथील आमदार विजयपाल सिंह व मौगंज येथील आमदार प्रदीप पटेल काही दिवसांपासून सरकारविरोधात आवाज उठविताना दिसत आहेत. मध्य प्रदेश भाजपात नक्की काय घडतंय? आमदारांनी स्वतःच्या पक्षविरोधात आवाज उठविण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
काही दिवसांपासून मध्य प्रदेश भाजपात पक्षांतर्गत वाद सुरू आहे. पक्षात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पक्षांतर्गत गोंधळ सुरू आहे. तर, दुसरीकडे स्थानिक मुद्द्यांवरून काही आमदारांचा गट स्वतःच्याच पक्षावर टीका करताना दिसत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीला जेमतेम सहा महिने झाले आहेत. या निवडणुकीत भाजपाला बुधनी मतदारसंघ कायम ठेवण्यात यश आले होते; परंतु विजयपूर मतदारसंघ भाजपाला कायम ठेवता आला नाही. या मतदारसंघात काँग्रेसकडून भाजपाचा पराभव झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर राज्य युनिटमध्ये एकता सुनिश्चित करण्यासाठी दबाव वाढला असल्याचे भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.
राज्य सरकारवर टीका करणारे प्रीतम लोधी यांनी शिवपुरी जिल्ह्यातील एका जाहीर सभेत पक्षातील एका मंत्र्याला लक्ष्य केले. त्यानंतर या गोंधळाला सुरुवात झाली. त्यांनी म्हटले, “एक आळशी मंत्री आला आहे आणि त्याच्या येण्याने काँग्रेस नेत्यांच्या आशा वाढल्या आहेत. जर आमच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे काम झाले नाही, तर मी त्यांचे नळ कनेक्शन आणि रस्ते तोडून टाकेन,” असे ते म्हणाले. स्थानिक, आणि पोलीस सुधारणांव्यतिरिक्त त्यांनी पिछोरला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्याची मागणीही केली आहे. त्यांचा दावा आहे की, हे आश्वासन माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले होते. लोधी यांच्या मते, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या; परंतु केल्या गेलेल्या कोणत्याही मागणीवर कोणताही निकाल लागलेला नाही.